IEW 2026: इंडिया एनर्जी वीक 2026 मध्ये भारत–कॅनडा मंत्रीस्तरीय ऊर्जा संवादाची सुरुवात
IEW 2026: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या निमंत्रणावरून, कॅनडाचे ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधन मंत्री टिमोथी हॉजसन यांनी गोव्यामध्ये आयोजित इंडिया एनर्जी वीक 2026 (आयईडब्ल्यू’26) मध्ये भाग घेतला.

IEW 2026: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या निमंत्रणावरून, कॅनडाचे ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधन मंत्री टिमोथी हॉजसन यांनी गोव्यामध्ये आयोजित इंडिया एनर्जी वीक 2026 (आयईडब्ल्यू’26) मध्ये भाग घेतला.
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय बैठक घेतली आणि नव्याने सुरु करण्यात आलेल्या भारत-कॅनडा मंत्रीस्तरीय ऊर्जा संवादाचा प्रारंभ केला. या बैठकीदरम्यान, दोन्ही देशांची सुरक्षा, कल्याण यासाठी ऊर्जा सुरक्षा आणि पुरवठ्यामधील विविधतेला असलेले असाधारण महत्त्व दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले.
ही बैठक म्हणजे कॅनडामधील कानास्कीस येथे जून 2025 मध्ये आयोजित जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने भारत आणि कॅनडाच्या पंतप्रधानांनी केलेल्या संवादाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या निर्देशांचा पाठपुरावा आहे, यावेळी दोन्ही नेत्यांनी वरिष्ठ मंत्रीस्तरीय, तसेच कार्यकारी स्तरावरील संवाद पुन्हा सुरू करण्याच्या महत्त्वावर जोर दिला होता.
भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि नॅचरल रिसोर्सेस कॅनडा यांनी दोन्ही देशांच्या ऊर्जा क्षेत्रांचे पूरक स्वरूप आणि ऊर्जा विषयक बाबींवर शाश्वत सहभागाद्वारे मिळणारा लाभ जाणला. कॅनडाने निर्यात विविधतेला प्राधान्य देऊन स्वच्छ आणि पारंपरिक ऊर्जा क्षेत्रात ऊर्जा महासत्ता बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, तर जागतिक ऊर्जा परिदृश्याचे केंद्रस्थान असलेल्या भारतामध्ये, व्याप्ती, स्थिरता आणि दीर्घकालीन संधींवर आधारित, नैसर्गिक आणि सहजीवी भागीदारीची संधी उपलब्ध आहे.
दोन्ही नेत्यांनी परस्परांच्या ऊर्जा क्षेत्रात संयुक्त व्यावसायिक आणि गुंतवणूक भागीदारीचे महत्त्व ओळखले. दोन्ही नेत्यांनी जागतिक जैवइंधन आघाडी (जीबीए) द्वारे जैवइंधनाचा जागतिक विकास आणि वापराच्या माध्यमातून जागतिक ऊर्जा संक्रमणाला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या सहयोगी प्रयत्नांची दखल घेतली, यामध्ये कॅनडा, हा निरीक्षक आहे.
हेही वाचा – India FTA: भारताचा 22 देशांबरोबर मुक्त व्यापार करार – मंत्री पियुष गोयल





