पुणे | देशाची प्रतिमा दहा वर्षांत खालावली

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दहा वर्षांत देशात विकास झाल्याचा दिखावा भाजप सरकारकडून केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात वेगळी परिस्थिती आहे. देशाची प्रतिमा जगात खालावली आहे. विविध आकडेवारीवरून हे दिसून येत आहे, अशा शब्दांत केंद्र सरकारवर कॉंंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी टिका केली आहे.
लोकशाही स्तंभ धोक्यात आल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ व्यापारी मेळाव्याचे आयोजन केले होते.
त्यामध्ये ते बोलत होते. यावेळी कॉंंग्रेसचे राज्य सरचिटणीस ॅअड. अभय छाजेड, पुणे शहर जिल्हा कॉंंग्रेस कमिटी, व्यापारी सेलचे अध्यक्ष भरत सुराणा, महाराष्ट्र कॉंंग्रेस व्यापारी सेलचे अध्यक्ष जनक व्यास, कॉंंग्रेसचे राज्य उपाध्यक्ष आबा बागुल, दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार, माजी अध्यक्ष वालचंद संचेती, पोपटलाल ओस्तवाल, राजेश शहा, राजेंद्र बाठिया, विठ्ठल मणियार, हिरालाल चौधरी, मिलिंद फडे आदी उपस्थित होते.
सिंघवी म्हणाले की, लोकशाहीचे स्तंभ धोक्यात आले आहेत. संसदीय लोकशाही, न्यायव्यवस्था, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियासारख्या स्वायत्तता यंत्रणा धोक्यात आल्या आहेत. चौकशी यंत्रणेला हाताशी धरून होणाऱ्या राजकारणातून संपूर्ण लोकशाही वेठीस धरली जाते आहे.
जनतेने लोकशाही वाचवण्यासाठी सकारात्मक विचारावर विश्वास ठेवला पाहिजे. आपण सर्वांनी मिळून लोकशाही बळकट व जिवंत ठेवण्यासाठी पुढे आले पाहिजे. केवळ नाराजीतून आणि नकारात्मक विचारातून या घडामोडींकडे पाहत राहिलो तर सामाजिक परिवर्तन होणार नाही.
तसेच लोकशाही टिकू शकणार नाही. लोकशाही टिकवणे हे आपले कर्तव्ये आहे. काही काळासाठी वाईट प्रवृत्तीचे लोकं संविधान हातात घेऊन संविधानाचा गैरवापर करू शकतात. परंतु, कायमस्वरूपी संविधानाला नुकसान पोहचवू शकत नाही. तरीदेखील मागील १० वर्षांच्या काळात संविधानाला नुकसान करण्यात आले आहे. राज्यघटना बदलण्याचा घाट हाणून पाडू शकतो. झालेल्या नुकसानीच्या दुरुस्तीसाठी सर्वांना एकत्र यावे लागणार आहे.




