पिंपरी – आई कामावर जात असताना पाच वर्षांचा चिमुकला नकळत आईच्या मागे गेला. रस्ता ओलांडताना अचानक आई दिसेनाशी झाली. अन तो चिमुकला कंपनीच्या गेटवर धाय मोकलून रडत बसला. तर आईला आपला मुलगा हरवल्याची कल्पना देखील नाही. मात्र हिंजवडी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार अशोक सकुंडे यांनी दिवसभर प्रयत्न करत माय-लेकराची भेट घडवून आणली.
अभय रामू सिंह (वय 5) हा अंगणवाडीमध्ये शिकतो. त्याची आई शीतल हिंजवडी फेज एक येथील एका कंपनीत काम करते. रविवारी (दि. 23) शाळेला सुट्टी असल्याने आईच्या मागे तो नकळत कामावर निघाला.हिंजवडी फेज एक येथील कंपनीच्या गेटमधून ओळखपत्र दाखवून आई कंपनीच्या आत गेली. अभयला रस्ता ओलांडण्यासाठी थोडा वेळ लागल्याने तो थोडा उशिरा गेटवर पोहोचला. मात्र सुरक्षा रक्षकांनी अभयला आतमध्ये न सोडल्याने तो रडत बसला.
त्यावेळी हिंजवडी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार अशोक सकुंडे तिथून गस्त घालत असताना त्यांना लहान मुलगा रडत असल्याचे दिसले. त्यांनी रडणाऱ्या मुलाकडे जाऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव अभय असे सांगितले. आई, वडिलांबाबत चौकशी केली असता तो “आई’ असे म्हणून कंपनीच्या दिशेने बोट दाखवत असे.सकुंडे यांनी कंपनीच्या गेटवरील सुरक्षा रक्षकांकडे चौकशी केली. कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनीही त्याच्या आईबाबत सांगण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यानंतर सहायक फौजदार सकुंडे पाच वर्षांच्या अभयला घेऊन त्याचे घर शोधू लागले.
तीन तास शोध घेऊन आणले पोलीस ठाण्यात
अभयने तीन तास सकुंडे यांना बऱ्याच ठिकाणी फिरवले. मुलगा घाबरुन जाऊ नये म्हणून सकुंडे यांनी रस्त्यात त्याला तो जे मागेल ती खेळणी, आईसक्रीम, खाऊ घेऊन दिला. त्यानंतर सकुंडे यांनी अभयला हिंजवडी पोलीस ठाण्यात आणले. सायंकाळी गस्त घालत असताना त्यांना एक महिला कुणाचा तरी शोध घेत असल्याचे दिसून आले. त्यांनी तिच्याकडे चौकशी केली असता ती आपल्या पाच वर्षीय मुलाचा शोध घेत असल्याचे सांगितले. सकुंडे यांनी शीतल यांना पोलीस ठाण्यात आणले. आईला बघताच चिमुकला अभय आईच्या कुशीत धावत गेला. हिंजवडी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अभयला त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले. सहायक फौजदार अशोक सकुंडे यांच्या कामगिरीचे पोलीस आयुक्तांनी देखील कौतुक केले.