देशात एकाच दिवसात आढळले उच्चांकी 15 हजार 968 करोनाबाधित

नवी दिल्ली -देशात मंगळवारपासून 24 तासांत नवे 15 हजार 968 करोनाबाधित आढळले. बाधित संख्येतील ती एकाच दिवसातील उच्चांकी भर ठरली. त्याशिवाय, देशात एकाच दिवसातील सर्वांधिक 465 मृत्यूंची नोंद झाली.
देशातील करोनाबाधितांची संख्या आता 4 लाख 60 हजारांच्या, तर बळींची संख्या 15 हजारांच्या घरात पोहचली आहे. देशात सलग 5 व्या दिवशी 14 हजारांहून अधिक नवे बाधित आढळले. त्यामुळे चालू महिन्यातील (जून) 24 दिवसांत बाधितांमध्ये तब्बल 2 लाख 65 हजार इतक्या संख्येची भर पडली. त्यासाठी महाराष्ट्र, दिल्ली, तामीळनाडू, गुजरात आणि उत्तरप्रदेश या पाच राज्यांतील वाढ कारणीभूत ठरली आहे. दिल्लीतील बाधितांची संख्या मागील काही दिवसांत झपाट्याने वाढली. त्यामुळे त्या संख्येत दिल्ली आता देशात महाराष्ट्रापाठोपाठ दुसऱ्या स्थानी पोहचली आहे.
करोनाबळींच्या संख्येतही महाराष्ट्रानंतर दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीत 2 हजार 300 हून अधिक बाधित मृत्युमुखी पडले आहेत. त्यापाठोपाठ गुजरातमध्ये 1 हजार 700 हून अधिक बाधित दगावले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात 1 लाख 83 हजार सक्रिय बाधित आहेत. त्यापेक्षा करोनामुक्त झालेल्या बाधितांची संख्या 75 हजारांनी अधिक आहे. आतापर्यंत 2 लाख 58 हजारांहून अधिक बाधित बरे झाले आहेत. करोना संसर्ग झालेले रूग्ण बरे होण्याचे देशातील प्रमाण 56. 71 टक्के इतके आहे. देशात मंगळवारपर्यंत 73 लाख 52 हजारांहून अधिक करोनाविषयक चाचण्या घेण्यात आल्या.





