एनआरआयकडून भारतात येतात सर्वात जास्त डॉलर

मुंबई – अनिवासी भारतीय आणि परदेशात काम करीत असलेल्या भारतीयांकडून भारतात येणारी परकीय चलनाच्या स्वरूपातील रक्कम जगात सर्वात जास्त आहे. अमेरिका किंवा युरोपातील कोणत्याही देशापेक्षा भारतात येणारी ही रक्कम जास्त आहे. सरलेल्या वर्षात या भारतीय नागरिकांनी मायदेशात पाठवलेली रक्कम म्हणजे रेमीटन्स तब्बल 129 अब्ज डॉलर इतके आहे. गेल्या अनेक वर्षापासून भारतात येणार्या परकीय चलनाचे रक्कम इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे. याला सरलेले वर्ष अपवाद झालेले नाही.
रक्कम इतकी जास्त आहे की, बांगलादेश आणि पाकिस्तानच्या अर्थसंकल्पातील एकूण तरतुदीची बेरीज केली तरी भारतात परदेशातून येणारी रक्कम जास्त आहे. पाकिस्तानचा अर्थसंकल्प 67 अब्ज डॉलरचा आहे. तर बांगलादेशाचा अर्थसंकल्प 68 अब्ज डॉलरचा आहे.
त्याचबरोबर भारतात येणारी रक्कम मेक्सिकोमध्ये येणार्या रकमेपेक्षा दुप्पट आहे. या यादीत भारतानंतर मेक्सिकोचा समावेश होतो. मेक्सीकोतील अनेक नागरिक अमेरिकेत काम करून पैसे परत पाठवीत असतात.
मेक्सिकोत यावर्षी 68 अब्ज डॉलर आले. चीनमध्ये 48 अब्ज डॉलर आले. फिलिपाईन्समध्ये 40 अब्ज डॉलर आले. तर पाकिस्तान मध्ये 33 अब्ज डॉलर आले. पाकिस्तानातील बरेच नागरिक सौदी अरेबिया आणि इतर मध्यपूर्वेतील देशात काम करून पाकिस्तानात पैसे पाठवीत असतात.
गेल्या पाच वर्षापासून भारतात 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त रक्कम येते. फक्त याला अपवाद करोनाच्या काळातील 2020 हे वर्ष होते. 2020 मध्ये भारतात 83 अब्ज डॉलरची रक्कम आली. या कालावधीत भारतात आलेली रक्कम वर्षानुवर्ष वाढत चालली आहे असे जागतिक बँकेने या संदर्भात संकलित केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.
भारतीय नागरिकांनी भारतात पाठविलेली रक्कम थेट परकीय गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे. भारतात या काळात थेट परदेशी गुंतवणूक 62 अब्ज डॉलरची झाली. त्याचबरोबर ही रक्कम भारताच्या संरक्षण क्षेत्रातील तरतुदीपेक्षा जास्त म्हणजे 55 अब्ज डॉलर पेक्षा जास्त आहे.
गेल्या दहा वर्षात म्हणजे 2014 ते 2024 या कालावधीत भारतात परदेशात राहत असलेल्या नागरिकाकडून आलेल्या रकमेत 57% वाढ होऊन ती 982 अब्ज डॉलरवर गेली आहे. त्यामुळे भारताला परकीय चलन साठ्याबाबत फार चिंता करण्याची गरज पडत नाही. भारताकडे सध्या 652 अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा आहे. हा परकीय चलन साठा एक वर्षाच्या आयातीसाठी पुरेसा आहे, असे समजले जाते.





