“त्या’ घोटाळेबाजांच्या मालमत्तांवर येणार टाच?

शिवांजली व गणेश पतसंस्था घोटाळा प्रकरण
अरुण पवार
पाटण – तालुक्यातील नवारस्ता येथील शिवांजली पतसंस्था आणि मोरणा भागातील गणेश पतसंस्था या दोन्ही पतसंस्थेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला असून ठेवीदारांचे पैसे बुडण्याच्या मार्गावर आहेत. याप्रकरणी ठेवीदारांचा मोठा आक्रोश सुरू आहे. याची दखल घेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दोन्ही पतसंस्थांच्या गैरव्यवहार प्रकरणी विशेष अधिकारी नेमून जलद गतीने तपास करा. तसेच ठेवीदारांचे पैसे कोणत्याही परिस्थितीत परत मिळण्याच्या दृष्टीने कारवाई करा, असे आदेशही त्यांनी नुकतेच दिले आहेत.
यावर स्पष्टीकरण देताना संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, गैरव्यवहार प्रकरणी दोषी संचालक व कर्मचाऱ्यांच्या काही मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे घोटाळेबाजांच्या मालमत्तेवर टाच येणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवारस्ता येथील शिवांजली पतसंस्थेत सुमारे 13 ते 14 कोटींचा, तर गोकुळतर्फ पाटण येथील गणेश पतसंस्थेत पाच कोटींचा गैरव्यवहार झाल्याबाबतचे गुन्हे पोलिसात नोंद झाले आहेत. दरम्यान, गुन्हे नोंद होतच संबंधित पतसंस्थांचे संचालक व कर्मचारी परागंदा झाले आहेत. इकडे मात्र ठेवीदार रोजच आपल्या ठेवी परत मिळण्यासाठी आक्रोश करत आहेत. ही बाब वारंवार पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कानावर घातली गेली. तसेच या प्रकरणाच्या तपासात पोलीस दिरंगाई करत असल्याची तक्रारही ठेवीदार व शेतकरी संघटना करत होती.
अखेर, याप्रश्नी सातारा येथे झालेल्या बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या समक्ष या दोन्ही पतसंस्थांच्या गैरव्यवहार प्रकरणी तपासासाठी विशेष अधिकारी नेमून जलद गतीने तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि निबंधक कार्यालय विभाग खडबडून जागे झाले आहेत.
शिवांजली पतसंस्थेवर प्रशासक नेमून कर्ज वसुलीनंतर ठेवीदारांचे पैसे पार्ट देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. याप्रकरणी संचालकाचा एक बियर बारही सील करण्यात आला होता. मात्र, मल्हारपेठ पोलिसांना गायब झालेले संचालक व कर्मचारी शोधण्यास अद्याप अपयश आले आहे.
मोरणा भागातील गणेश नागरी पतसंस्था पोलिसांनी सील केली असून या संस्थेचे संचालक व कर्मचारी देखील गुन्हा दाखल झाल्यापासून परागंदा झाले आहेत. यातील काही संचालक व कर्मचारी न्यायालयाने जामीन दिल्याचे सांगून बिंदास्त वावरत आहेत.
पैसे परत न मिळाल्यास उद्रेक होण्याची चिन्हे
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जलद गतीने तपासाचे आदेश दिल्यानंतर पोलीस आणि संबंधित यंत्रणेने दोषी संचालकांवर कारवाई सुरू केली नाही. तसेच ठेवीदारांचे पैसे परत देण्याची प्रक्रिया सुरू केली नाही. तर येणाऱ्या काळात दोन्ही पतसंस्थांचे ठेवीदार मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. याचा परिणाम आपोआपच येणाऱ्या निवडणुकांवर होऊन याचा रोष नेत्यांवर येणार आहे.
=============





