पाटण (अरुण पवार ) : पाटण तालुका म्हटले की डोळ्यासमोर उभा राहतो निसर्गाचा अनमोल ठेवा. परंतु, मुबलक पाऊस झाल्याने हिरव्या गर्द झाडीने नटलेले डोंगर आता पेटू लागले असून पाटण तालुक्यात वणवे लावणारे कार्यरत झाल्याचे दिसते. याबाबत पाटण वन विभागाची उपाययोजना काही दिसत नाही. त्यामुळं वणवे लावणारे समाजकंटक अधिक वेगाने सक्रिय होण्याची भीती असून यांना रोखले नाही तर तालुक्यातील निसर्गाची राख रांगोळी होण्यास मोजकेच दिवस पुरेसे ठरतील, अशी स्थिती आहे. पावसाळा लांब कालावधीसाठी वाढल्याने पाटण तालुक्यात आत्तापर्यंत कधीच झाली नाही इतकी निसर्गाची मोठी वाढ झालेली दिसून येते. अजूनही पाटणचे डोंगर गर्द हिरवाईने नटलेले दिसत आहेत. वन विभागाच्या हद्दीतील जंगले तर नजरेत भरत आहेत. परंतु,आता हिवाळा असला तरी दिवसभराच्या उन्हाच्या तडाख्याने डोंगरावरील वाढलेले गवत सुकू लागली आहेत. त्यामुळे गावोगावच्या कडेला असलेले डोंगर वणवे लावणाऱ्यांच्यामुळे पेटू लागले आहेत. वणवे लावण्याची आता ही सुरुवात आहे याला प्रतिबंध घालण्यासाठी वन विभाग कशा रीतीने सामोरे जाते हे पुढील काही दिवसातच दिसणार आहे. वन विभागाने काय उपाययोजना केला याबाबत पाटण वनक्षेत्रपालांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तो झाला नाही. मालकीत लावलेला वणवा पेटवतोय जंगले पाटण तालुक्याची नैसर्गिक व भौगोलिक रचनाच अशी आहे की गावागावांतील शेतीच्या शेजारी वन विभागाचे भले मोठे डोंगर असल्यामुळे शेतातील गवत जाळण्यासाठी लावलेला वणवा आपोआप जंगलात शिरतो याबाबत शेतकरी ही जागरूक नसतात. शेतातील गवत पेटवून घरी जायचे नंतर काही तासाने डोंगर पेटलेला दिसतो अन्यथा व्याघ्र प्रकल्पही पेटणार? ढेबेवाडी, कोयना, मोरगिरी विभागातील अनेक गावे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनला लागून आहेत. त्यामुळे दरवर्षी या विभागातील किंवा गावाच्या शेजारील वणवे लागलेले विझवण्यासाठी वन विभाग किंवा वन्यजीव विभाग यांचे दुर्लक्ष किंवा ते अपयशी ठरल्याने व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधून कोअरमध्येही वणवे लागले अशा घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात वाघ सोडण्याची मोहिम आणि जंगलातील लहान मोठे प्राणी अशा वणव्यामुळे किती सुरक्षित राहतील हे येणारा काळ सांगेल पवनचक्की परिसराकडे वणव्याची सुरुवात पाटणच्या वनकुसवडे, सडा वाघापूर आणि मोरणा भागातील मनेरी, कोकिसरे, डावरी, नाटोशी, मरळी, कळकेवाडी या गावांच्या डोंगरावर पवनचक्की कंपन्यांचे टॉवर आहेत. जवळपास हजारो टॉवर असल्यामुळे येथे रात्रीच्या वेळी रात्रगस्त वॉचमन किंवा पवनचक्की कंपन्यांचे कर्मचारी असतात.त्यात पवनचक्की टॉवरच्या परिसरात मोठे गवत वाढले आहे. मग जागा साफसफाई हवी असेल तर गवत पेटवले जाते आणि तेच पुढे वणव्यात रूपांतर होते.