पिंपरी | कंपनीच्या वायूप्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

खालापूर, (वार्ताहर) – ढेकू गावातील प्लॅस्टिक टेप उत्पादन करणाऱया केमिकल कंपनीमार्फत धुरावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता ते हवेत सोडले जाते आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड वायू प्रदूषण होत आहे. परिणामी रहिवाशांना डोळे झोंबणे आणि श्वासाचे विकार होण्याची भिती व्यक्त होत आहे.
या विषयी गेल्या दोन -तीन वर्षांपासून तक्रार करूनही शासन लक्ष देत नसल्यामुळे तेथील रहिवासी दिलीप पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
खालापूर तालुक्यातील साजगाव ग्रामपंचायत हद्दीमधील अनेक कारखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ढेकू गावातही अशी स्थिती निर्माण होत आहे. रसायन कंपनीची वायू सोडणाऱया चिमणीची उंची कमी असल्याने काळा धूर नागरिकांच्या घरात परसरतो. तसेच धुराची काळी माती घरात पसरते.
तर, घरातील व परिसरातील लहान मुले, स्त्रियांना, ज्येष्ठ नागरिकांना डोळे झोंबणे आणि श्वासाचे विकार होण्याची शक्यता आहे. दिलीप पाटील यांनी प्रदूषण मंडळ, खालापूर तहसिलदार, पोलीस स्टेशन, साजगाव ग्रामपंचायतीकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याची दखल घेतली गेली नाहे. तर, दिलीप पाटील यांच्या पत्नी गुलाब पाटील या साजगाव ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या असतानाही न्याय मिळत नसल्यामुळे त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.





