Nagar | निधी वाटपात पालकमंत्र्यांनी अन्याय केला

नेवासा (प्रतिनिधी) – पालकमंत्र्यांना निधी वाटपात कधीच मनमानीपणा करता येत नाही पण आपल्या तालुक्यावर हा अन्याय केला गेला आणि तोंड बघून निधी वाटप करण्याचे काम केले. केवळ माझ्यावर आरोपाचे रान उठवले जात आहे.
जर निधीच मिळाला नाही तर कामे तरी कशी होणार? असा सवाल करून आमदार शंकरराव गडाख यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. महाविकास आघाडीचे सरकार येऊ द्या, तोपर्यंत तुम्ही कळ काढा मग विकास काय असतो ते पुन्हा एकदा दाखवून देवू, अशी ग्वाही कार्यकर्त्यांना दिली.
सोमवारी (दि.२९) सकाळी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नेवासा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात गडाख बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते, माजी खासदार यशवंतराव गडाख पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, खासदार भाऊसाहेब वाकचौरे,
शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, दलित नेते अशोकराव गायकवाड, माजी जि.प.सदस्य दत्तूभाऊ काळे, अॅड.अण्णासाहेब अंबाडे, हभप रामनाथ महाराज पवार, शेतकरी नेते दादासाहेब चिमने यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
आ.गडाख म्हणाले की, तालुक्याच्या जनतेने आणि कार्यकर्त्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलेले असून मला अपक्षही निवडून दिलेले होते. या सत्तेच्या माध्यमातून मी अनेक प्रश्न सोडविलेले असून काही प्रश्न बाकी आहेत. ते सोडविण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. मात्र, तुमची साथ मला अशीच राहू द्या आणि घराघरात आपले मशालचिन्ह पोहचवा, असे आवाहन आ.गडाख यांनी कार्यकर्त्यांना केले.
विरोधकांकडून आमच्यावर खालच्या पातळीवर टीका केली जाते मात्र, मी आमदार आणि मंत्री असतानाही एकाच गाडीत बसत होतो आणि आजही याच गाडीत असतो. मात्र, त्या दोघांकडे दोन – दोन, चार – चार आज गाड्या आहेत, त्यालाही माझी मदत होती. ते दोघे हे आज मान्य करणार नसल्याचा टोलाही मुरकुटे – लंघे यांचे नाव न घेता लगावला.
तुम्ही आरोप केले तर मलाही बोलावे लागेल? तुमचेही कारनामे आमच्याकडे आहेत, असा इशाराही आ.गडाख यांनी दिला. विरोधी उमेदवाराचे चित्र आज – उद्या स्पष्ट होईल, पण २०१४ चे किंगमेकर जे होते ते आज किंग होण्याच्या मार्गावर आहेत. आणखी चित्र स्पष्ट झाल्यावर पुन्हा बोलू, असे सांगून आ.गडाख यांनी कार्यकर्त्यांना मशाल चिन्ह घराघरात पोहचविण्याचे आवाहन केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
नेवाशाच्या गल्लीबोळात मशालची हवा
रेकॉर्ड ब्रेक शक्ती प्रदर्शन करत आ.शंकरराव गडाख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शहरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित असल्यामुळे गल्लीबोळात केवळ मशाल आणि मशालचीच हवा निर्माण झाल्याचे दिसू आले.शिरसगाव येथील युवकांनी आ.गडाख यांच्या उपस्थित उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला.
नेवासा शहरात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सोमवारी दाखल झालेले होते. त्यामुळे नेवाशात मशाल चिन्हाचा गल्लीबोळात निनाद उसळून आलेला होता.अनेक जण मोटारसायकल रॅलीने सभास्थानी आलेले होते. “नेवाशात नाव गाजते शंकरराव गडाख” हे गाणे सभास्थानी वाजत असल्यामुळे आ. गडाख यांच्या नावाचा जयजयकार सुरू असल्याचे दिसून आले.





