रशियाच्या सैन्याची मोठी पीछेहाट; युक्रेनने पुन्हा घेतला ब्रोव्हारीचा ताबा

लिव्ह (युक्रेन) – युक्रेनची राजधानी किव्ह पासून 20 किलोमीटर अंतरावरील ब्रोव्हारी नावाच्या शहरावर युक्रेनच्या फौजांनी पुन्हा एकदा ताबा मिळवला आहे. ब्रोव्हारी शहराच्या महापौरांनी शुक्रवारी संध्याकाळी टिव्हीवरून केलेल्या भाषणामध्ये ही माहिती दिली आहे. ब्रोव्हारी शहरातील ज्या भागांवर रशियाच्या फौजांनी ताबा मिळवला होता, तेथून आता रशियाच्या सैन्याला पीछेहाट करावी लागली आहे, असे महापौरांनी म्हटले आहे.
ब्रोव्हारी जिल्ह्यातल्या ज्या भागांमध्ये रशियाच्या सैन्याच्या चौक्या उभारल्या गेल्या होत्या. त्या हटवण्यासाठी युक्रेनच्या सैन्याची मोहिम लवकरच सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रशियाच्या सैन्याने ठिकठिकाणी भुसुरुंग पेरून ठेवले आहेत. ते शोधून काढून निकामी करण्याचे काम आता केले जाणार आहे, असेही महापौरांनी सांगितले.
ब्रोव्हारी शहरातील नागरिक आता पुन्हा एकदा या शहरामध्ये परत येऊन रहायला लागले आहेत. तेथील दुकाने आणि उद्योग पुन्हा सुरू केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. यापूर्वी शुक्रवारी किव्ह शहराचे महापौर विटाली क्लिस्चको यांनीही युक्रेनच्या सैन्याला मोठे यश मिळत असल्याचे सांगितले होते. किव्ह शहराच्या वायव्येकडील काही भागात युक्रेनच्या सैन्याने मोठी आघाडी मिळवली आहे. त्यानंतर या भागावर पुन्हा एकदा रशियाच्या सैन्याने हल्ले सुरू केले गेले असल्याचे उपग्रहाच्या फोटोंध्ये दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.




