Nagar | महायुतीचं ठरलं; महाविकास आघाडीला गुंता सुटेना

नगर, (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तरी अद्यापही महाविकास आघाडीत नगर शहराच्या जागेचा तिढा काही सुटलेला नाही. या जागेवर आघाडीतील तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. त्यामुळे ही जागा नेमकी कोणाकडे जाणार याबाबत अजूनही अनिश्चिता आहे. काँग्रेसमध्ये एकच उमेदवार इच्छुक आहे.
मात्र शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी शरद पवार पक्षात इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यांच्यात एकमत होणे अशक्य असल्याने जागेचा तिढा सुटला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
महायुतीकडून राष्ट्रवादी अजितदादा गटाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांची उमेदवारी निश्चित आहे. अर्थात या जागेवर भाजपने दावा केला आहे. पण स्थानिक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार झाला नाही. त्यामुळे आ. जगताप हेच उमेदवार निश्चित आहेत.
गेल्या दहा वर्षापासून आ.जगताप यांनी नगर शहरात युवकांची मोठी फळी उभी केली असून त्यांचा शहरात दांडगा जनसंपर्क आहे. ‘मोबाईल आमदार’ म्हणून त्यांची प्रतिमा असून शहरात तब्बल 600 कोटींहून अधिकची विकास कामे आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी तेवढाच तुल्यबळ उमेदवार सध्या तरी महाविकास आघाडीकडे नाही.
महायुतीमध्ये भाजपने देखील या जागेवर दावा केला आहे. पक्षातील इच्छुकांच्या शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन त्यांना विनंती केली.
एवढेच नाही तर पक्षाचा उमेदवार नसेल तर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रचार करण्यासाठी नगर शहर सोडून दुसरा मतदारसंघ देण्याची मागणी देखील करण्यात आली. पक्षात शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, प्रदेशचे वसंत लोढा, महेंद्र गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे हे इच्छुक आहेत.
मात्र ही जागा अजितदादा गटाकडे गेली आहे. त्यामुळे त्यांचे प्रयत्न व्यर्थ गेले आहेत. अर्थात भाजपचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते आ.जगताप यांचे काम करणार नाहीत. पण त्यांचा कोणताही परिणाम आ. जगताप यांच्यावर होणार नाही. गेल्या दहा वर्षापासून आ. जगताप नगर शहराचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.
ही त्यांची तिसरी निवडणूक असून ते आता हॅट्रट्रिक करणार का याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष आहे. अर्थात आ. जगताप यांचा शहरात मोठा जनसंपर्क आहे. त्यात युवकांची मोठी फळी प्रत्येक प्रभागात आहे.
कोणीही बोलले की ते दुसर्या मिनिटाला तेथे हजर असतात. शहरातील बहुतांशी समस्यांवर त्यांनी तोडगा काढला आहे. त्यामुळे नगरकरांमध्ये आ. संग्रामभैय्या म्हणून सर्व परिचित आहेत.
माजी आमदार स्व. अनिल राठोड यांच्या पद्धतीने तेही आता मोबाईल आमदार झाले आहेत. प्रत्येकाच्या सुख दुःखात ते सहभागी होतात. आ. जगताप यांची शहरात पक्षासह स्वतःचीच मोठी यंत्रणा उभी आहे.
गेल्या पाच वर्षात सत्तेच्या माध्यमातून त्यांनी शहरातील विकास कामांचा सपाटा लावला आहे. 600 कोटीहून अधिक कामे त्यांनी केली आहेत. विशेषतः नगर शहरातील रस्त्यांचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला आहे. सध्या अनेक रस्त्यांची कामे सुरू आहेत.
त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीसह धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. पण कामेही महत्वाची असल्याने व रस्त्यांची कामे होत असल्याचे पाहून नगरकरांनी देखील त्यांचे स्वागत केले आहे.
त्यामुळे आ. जगताप यांचे वाढलेले प्रस्त पाहता सध्या तरी तुल्यबळ लढत होईल असे वाढत नाही. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी महापौर अभिषेक कळमकर, डॉ. अनिल आठरे, शौकत तांबोळी तर शिवसेना उबाठाकडून जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे हे इच्छुक आहेत.
अर्थात ही जागा कोणत्या पक्षाला जाणार त्यानंतर उमेदवार ठरणार. मात्र शिवसेनेला जागा सुटली तर त्यांच्या एकमताने कोण उमेदवार असा प्रश्न आहे. सध्या प्रा. गाडे यांचे नाव आघाडीवर असून ही जागा शिवसेनला सुटणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पंरतू प्रा. गाडे यांना उमेदवारी दिली तर शिवसेनेत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. अन्य इच्छुक त्यांच्याविरोधात एकत्र येऊन त्यांच्यापैकी एकास उभे करण्याचा त्यांच्या हालचाली सुरू आहेत.
त्यामुळे शिवसेनेमध्ये उमेदवारीवरून चढाओढ सुरू आहे. ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडली तर कळमकर हे उमेदवार असतील. त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेनेची ताकद मोठी आहे. पण त्यांच्यात एकसंघपणा नाही.
कोतकर लढणार विधानसभा
माजी महापौर संदीप कोतकर हे कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा पक्ष कोणता असेल हे अद्याप निश्चित नाही. ते मशाल किंवा तुतारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत पण त्यांना या पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.
संदीप कोतकर यांच्या गटाने निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. स्वतः संदीप कोतकर की त्यांच्या पत्नी सुर्वणा कोतकर हे अजून निश्चित नाही. दरम्यान, आमदार संग्राम जगताप हे संदीप कोतकर यांचे साडू आहेत. त्यामुळे साडू- साडूमध्ये ही लढत होणार का याबाबत नगरकरांना उत्सुकता आहे.




