सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे ! कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची बळीराजाला ग्वाही

मुंबई – राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळला. या पावसाने बीड तसेच अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे ट्विट करत कृषिमंत्री (Agriculture Minister) धनंजय मुंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला आहे.
धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले की, राज्यातील सुमारे १६ ते १७ जिल्ह्यांमध्ये मागील दोन दिवसात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने हजारो हेक्टर शेती बाधित झाली असल्याचे वृत्त आहे; तसेच आणखी पुढचे काही दिवस अवकाळी पावसाचा अंदाज आहे. या अवकाळी व गारपीटीने रब्बीतील कापूस, कांदा, द्राक्ष, केळी, मोसंबी, डाळिंब, काढणीस आलेला भात, ज्वारी, गहू, हरभरा यांसह भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाल्याचेही निदर्शनास आले आहे.
कृषी, मदत व पुनर्वसन आणि महसूल विभागाच्या वतीने झालेला पाऊस व त्यामुळे झालेले नुकसान याची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. जिथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तिथे मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याची शासनाची भूमिका आहे.
मराठवाड्यात मोठे नुकसान
राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला. मराठवाड्यात अवघ्या चोवीस तासात अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली. अतिवृष्टीमुळे रबी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदाच्या खरीप हंगामात कमी पावसामुळे सहा जिल्ह्यांतील तर दोन जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे खरीप पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे.





