“सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली”; जयंत पाटलांचा प्रहार, सांगलीतल्या सभेतून केला हा निर्धार

Jayant Pati sangali | काल १५ मार्च रोजी सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अंनुषगाने पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले. तसेच राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पावर विविध प्रश्न पाटील यांनी यावेळी बोलताना उपस्थित केले. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवर त्यांनी भाष्य केले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर आपण अंदाज घेत आहोत. हा अंदाज न घेता आपण कामाला लागले पाहिजे. परिस्थिती कशीही असो आपली तयारी पाहिजे. त्यामुळे स्थानिक पातळीवर काम सुरू केले पाहिजे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.
त्या घोषणा फक्त निवडणुकीपुरत्या होत्या
या जिल्ह्याला संघर्ष काही नवा नाही, हा जिल्हा वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू यांचा जिल्हा. अनेक स्वातंत्र्य सैनिक या भागात होऊन गेले. त्यांचा मोठा वैचारिक वारसा या जिल्ह्याला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान सरकारने काही महामंडळे तयार करण्याची घोषणा केली होती. यातील काही महामंडळे आधीपासून होते. पण आता जो अर्थसंकल्प मांडला गेला त्यात या महामंडळांसाठी काहीच नव्हते. सांगण्याचे तात्पर्य हे की, त्या घोषणा फक्त निवडणुकीपुरत्या होत्या, असा निशाणा त्यांनी सरकारवर साधला. तसेच ते पुढे म्हणाले, यातील बऱ्यापैकी महामंडळे हे ओबीसी समाजातील होते. या सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली असल्याचा घणाघात त्यांनी सरकावर केला.
तरुणांची फौज तयार करा
आज अल्पसंख्याक समाजाला हे सरकार कमी लेखत आहे. निवडणुकीच्या दरम्यान सत्ताधारी लोकांनी कटेंगे तो बटेंगे असा नारा दिला होता. मात्र, आपल्या समाजाला पढेंगे तो बढेंगे या नाऱ्याची आहे. एआयच्या माध्यमातून आज जग कुठच्या कुठे गेले आहे आणि आपण कुठे अडकलोय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. घराघरात जाऊन लाडक्या बहिणींचे फॉर्म भरले आहेत. आता पैसे परत का घेतायत? असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला.
जय शिवराय!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – सांगली जिल्हाचा कार्यकर्ता मेळावा काल संपन्न झाला, त्यास संबोधित केले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर आपण अंदाज घेत आहोत. हा अंदाज न घेता आपण कामाला लागले पाहिजे.… pic.twitter.com/PftBEgLEok
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 16, 2025
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रत्येक तालुक्यानुसार ग्रुप बनवा. आ. रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली तरुणांची फौज तयार करा आणि पक्षाचा विस्तार करा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे, आ. अरूण लाड, आ. रोहित पाटील, माजी आमदार मानसिंग भाऊ नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार सदाशिव पाटील आदी उपस्थित होते.





