Drishya Adrishya: मुलगी अचानक गायब होते आणि सुरू होतो थरार! पूजा सावंतच्या ‘दृश्य अदृश्य’ने प्रेक्षकांना ठेवलं खिळवून
Drishya Adrishya ‘दृश्य अदृश्य’ हे नाव ऐकल्यावर एखादी मानसिक गुंतागुंत असलेली किंवा भास-आभासांवर आधारित कथा असावी असं वाटतं. मात्र, प्रत्यक्षात ही कथा एका आईच्या आयुष्यात अचानक आलेल्या संकटाभोवती फिरते.

Drishya Adrishya: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या थरारपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता अशोक समर्थ यांचा ‘दृश्य अदृश्य’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, त्याच्या वेगळ्या कथानकामुळे तो चर्चेत आला आहे. कोणताही भव्यदिव्यपणा, मोठे अॅक्शन सीन्स किंवा व्हिज्युअल इफेक्ट्सचा आधार न घेता प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याचं काम या चित्रपटाने केलं आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलिंद लेले यांनी केलं आहे. अतिशय साध्या पण प्रभावी पद्धतीने त्यांनी एक रहस्यमय कथा पडद्यावर मांडली आहे.
‘दृश्य अदृश्य’ हे नाव ऐकल्यावर एखादी मानसिक गुंतागुंत असलेली किंवा भास-आभासांवर आधारित कथा असावी असं वाटतं. मात्र, प्रत्यक्षात ही कथा एका आईच्या आयुष्यात अचानक आलेल्या संकटाभोवती फिरते.
चित्रपटात पूजा सावंतने तन्वी प्रधान ही व्यक्तिरेखा साकारली आहे. तन्वी सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करणारी एक तरुणी आहे. तिचा पती कामानिमित्त महाबळेश्वरमध्ये असतो. त्याचा वाढदिवस एकत्र साजरा करण्यासाठी तन्वी तिची लहान मुलगी ईशाला घेऊन महाबळेश्वरमधील एका हॉटेलमध्ये जाते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तिची मुलगी अचानक गायब झाल्याचं तिच्या लक्षात येतं. तन्वी सर्वत्र शोध घेते, पण ईशाचा काहीच पत्ता लागत नाही. यानंतर कथेत मोठं वळण येतं.
हॉटेलमधील कर्मचारी तन्वी एकटीच आली होती, तिच्यासोबत कोणतीही मुलगी नव्हती, असा दावा करतात. इतकंच नाही तर तन्वीसोबत मुलगी आली होती, याचा एकही पुरावा तिच्याकडे सापडत नाही. त्यामुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होतं.

marathi movie drishya adrishya
दरम्यान, पोलिसांनाही तन्वीवर संशय येऊ लागतो. त्यातच तिच्या पतीचाही संपर्क होत नाही. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. तन्वी खरं बोलत आहे का? तिला भास होत आहेत का? मुलगी नेमकी कुठे गेली? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रवास म्हणजे ‘दृश्य अदृश्य’ हा चित्रपट आहे.
चित्रपटात फार कमी व्यक्तिरेखा आहेत. तन्वी, तिची आई, दोन पोलीस अधिकारी आणि हॉटेलमधील काही कर्मचारी एवढ्याच पात्रांच्या माध्यमातून संपूर्ण कथा पुढे सरकते. त्यामुळे चित्रपट कुठेही भरकटत नाही.
दिग्दर्शक मिलिंद लेले यांनी कथा, पटकथा आणि दिग्दर्शन ही तिन्ही जबाबदाऱ्या स्वतः सांभाळल्या आहेत. त्यामुळे पडद्यावर दिसणारी कथा अधिक सुसंगत आणि प्रभावी वाटते. त्यांनी विनाकारण चित्रपटाची लांबी वाढवण्याचा प्रयत्न केलेला नाही. चित्रपटातील खलनायकाची ओळखही शेवटपर्यंत गुप्त ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पुढे काय होणार, याची उत्सुकता कायम राहते आणि प्रेक्षक चित्रपटाशी जोडले जातात.
अभिनेत्री पूजा सावंतने एका हतबल आईची भूमिका अतिशय सहज आणि प्रभावीपणे साकारली आहे. तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक होत आहे. अभिनेता अशोक समर्थ यांनी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दमदार काम केलं आहे. सुव्रत जोशी, अक्षया गुरव आणि इतर कलाकारांनीही त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. मात्र, अभिनेता हार्दिक जोशीसारख्या चांगल्या कलाकाराला खूप छोटी भूमिका देण्यात आल्याचं जाणवतं.
एकंदरीत, भव्य सेट, मोठा खर्च किंवा अॅक्शनवर अवलंबून न राहता केवळ दमदार कथा आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा हा एक चांगला मराठी थरारपट आहे. रहस्य आणि सस्पेन्स आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘दृश्य अदृश्य’ हा नक्कीच पाहण्यासारखा चित्रपट ठरू शकतो.





