पिंपरी | महामार्गालगत साचलेला कचरा अखेर उचलला

कामशेत, (वार्ताहर) – कामशेत शहर हद्दीत जुन्या मुंबई – पुणे महामार्गालगत साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे वृत्त दैनिक प्रभातच्या शुक्रवारच्या (दिनांक १८ ऑक्टोबर) अंकात प्रसिद्ध झाले होते.
या वृत्तामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने संबधित जागेवरील कचरा पूर्णपणे हटविला आहे. यावेळी कचऱ्याची समस्या मांडून ती सोडविण्यात योग्य भुमिका बजाविल्याबद्दल स्थानिकांनी दै. प्रभातचे आभार मानले आहेत.
मुंबई-पुणे महामार्गाजवळ उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढल्याने तिथे कचऱ्याचे ढीग साठले होते. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या आणि परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. सोबत कचऱ्यामुळे रोगराई पसरण्याचा धोकाही निर्माण झाला होता.
कचऱ्यातील अन्नपदार्थ खाण्यासाठी जमा होणाऱ्या भटक्या कुत्र्यांची संख्या देखील वाढली होती. त्यामुळे येथील नागरिक आणि प्रवासी त्रासले होते. नागरिकांच्या या समस्येला दैनिक प्रभातने वाचा फोडली आणि त्याचा परिणामही आता दिसून आला आहे.
प्रभात अंकात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर झोपलेल्या खडकाळे ग्रामपंचायतीला जाग आली. ग्रामपंतायतीने सोमवारी (दि.२१) तातडीने महामार्गालगत साठलेला सर्व कचरा उचलला आहे. ही कारवाई झाल्याने स्थानिक नागरिक, वाहन चालक, कामगार वर्गाने दैनिक प्रभाते आभार मानले आहेत.





