जैन समाजाचा प्रगतीचा पाया: साधू-संतांचा त्याग आणि महावीरांचे तत्त्व – योगी निरंजननाथ

आळंदी – “संघ म्हणजे संघटना, ही प्राचीन काळापासून महत्त्वाची आहे आणि जैन संघ हे उत्कृष्ट कार्य करत आहे. भगवान महावीरांनी दिलेल्या तत्त्वांचे पालन करत साधू-संतांच्या त्यागामुळे जैन समाज आज जगभर प्रगतीच्या शिखरावर आहे. अनवाणी पायांनी देशभर फिरत धर्मप्रसार करणारे जैन साधू हे या धर्माचे खास वैशिष्ट्य आहे. त्यांच्या या साधूंच्या रुपाने भगवान महावीर आजही समाज प्रबोधन करत आहेत.”, असे प्रतिपादन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी केले. श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघाने आयोजित केलेल्या 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या 2624 व्या जन्मकल्याणक दिनानिमित्त आळंदीतील जैन स्थानकात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
योगी निरंजननाथ पुढे म्हणाले की, जैन समाज संख्येने कमी असला तरी श्रीमंती आणि दानधर्मात तो अग्रेसर आहे. कलियुगातही चांगल्या गोष्टी घडताना दिसतात, त्या साधू-संतांच्या त्याग आणि शिकवणुकीमुळे. “जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत,” या संत ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणे महावीरांचे विचार साधूंमार्फत पुन्हा अवतरत आहेत. या प्रसंगी सुशील बहू मंडळाने महावीरांच्या जन्मावर आधारित नाटिका सादर केली, तर आनंद नवकार पाठशाळेतील मुलांनी जैन राष्ट्रगीत गाऊन वातावरण भक्तिमय केले. जैन धर्मग्रंथांवर आधारित गेम झोन स्पर्धांनी कार्यक्रमाला वेगळी रंगत आणली.
कार्यक्रमाला आळंदी नगरपालिकेचे अभियंता सचिन गायकवाड, आळंदी जैन श्वेतांबर स्थानकवासी संघाचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, उपाध्यक्ष सतीश चोरडिया, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, माऊली देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, माजी नगराध्यक्षा शारदा वडगावकर, महिला मंडळाच्या अध्यक्षा सरला लोढा, सुशील बहू मंडळाच्या अध्यक्षा भाग्यश्री चोरडिया, उपाध्यक्षा कल्पना रांका, आनंद नवकार पाठशाळेच्या तनुजा लुनावत, पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक आप्पा बागल, शहर भाजप अध्यक्ष किरण येळवंडे, शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष आनंदा मुंगसे, तसेच मदनलाल बोरुंदिया, मोहनलाल चोपडा, राजेंद्र धोका, रमेश नवलाखा, राजेंद्र चोपडा, प्रमोद बाफना, राजेंद्र लोढा, सागर बागमार, श्याम कोलन, सचिन बोरुंदिया, दिलीप नहार यांच्यासह आळंदी परिसरातील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निमित्ताने भगवान महावीरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक आळंदी शहरात ढोल-ताशांच्या तालावर, नामजयघोषात आणि युवक-युवतींच्या गरबा नृत्याने उत्साहात पार पडली. मार्गावर ठिकठिकाणी स्वागत आणि पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी वंदन केले. आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक भीमा नरके, मच्छिंद्र शेंडे आणि सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. गौतम प्रसादीने उत्सवाची सांगता झाली. सूत्रसंचालन श्रुती बोरुंदिया यांनी केले, तर सुरेश वडगावकर यांनी आभार मानले.





