पेमगिरीच्या माजी सरपंचाला गावगुंडांनी धमकावले

संगमनेर – तालुक्यातील पेमगिरी गावामधील एका माजी सरपंचाला जिल्हा हद्द बंदी असणाऱ्या एका गावगुंडाने धमकावल्यामुळे परिसरासह तालुक्यात दहशत निर्माण झाली आहे.
तालुक्यातील पेमगिरी गावामध्ये माजी सरपंचांनी उल्लेखनीय काम केले आहे. परंतु गावांमधील एका साथीदाराच्या मदतीने जिल्ह्याबाहेरील विविध गुन्ह्यांमध्ये अडकलेला तडिपार असलेला आरोपी पेमगिरी गावात आश्रय घेत असताना गावातील एका व्यक्तीने कृषी सेवा केंद्रातील काही वस्तू दुसऱ्या कृषी सेवा केंद्रात विकण्याचा प्रयत्न करत केला असता त्याला गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
त्यावेळी एका गावगुंडाने माजी सरपंचाच्या अंगावर धावून जात कानशिलात मारण्याचा प्रयत्न केला. बघता बघता काही गावकरी जमा झाले आणि गावाबाहेरचा व्यक्ती येऊन गावांमध्ये दादागिरी करतो, म्हणून त्याची यथेच्छ धुलाई केली. हे प्रकरण तालुका पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांसमोरच तडिपार असलेला आरोपी जाऊन बसला, परंतु गावच्या पुढाऱ्यांमुळे पोलीस दरबारी कोणतीही नोंद करण्यात आली नाही.
त्या वेळी त्या गावगुंडाने माजी सरपंचालाच थेट दम देत, “तुला पाहून घेतो, तुला सोडणार नाही’, असा सज्जड दम भरला. त्यानंतर गावामध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली. गावातील काही तरुण त्या जिल्ह्याबाहेरील व्यक्तीला मदत करत असून, त्याला गावातील मारहाण प्रकरण प्रकारात कुणाकुणाचा हात होता त्यांची नावे पाठवत होते. त्यामुळे माजी सरपंचानेही गावातील तरुणांना समज दिला.





