पिंपरी | फुलांचा बाजार फुलला , शेतकरी आनंदला

पवनमावळ, (वार्ताहर) – गेल्या दोन आठवड्यात फुलांचा बाजारभाव वाढला असून पवनमावळातील शेतकरी सुखावला आहे. पावसाने दिलेली उघडीप व फुलांची चांगली वाढ झाल्याने सध्या बाजारभाव वाढले आहेत. तर, फुलांचे बाजारभाव वाढल्याने पवनमावळ पूर्व भागातील शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कमी कालावधीत अधिक उत्पादन मिळवून देणारे पीक म्हणून पवनमावळातील शेतकरी फूल शेती करतात. फूल शेतीवर तेथील बरेच अर्थकारणही अवलंबून आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी परदेशातून गुलाबाला मागणी असते.
त्यामुळे पवनमावळातील सांगवडे, गहुंजे, दारुंब्रे, गोडुंब्रे, शिरगाव, सोमाटणे, चांदखेड, कुसगाव, साळुंब्रे आदी गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात झेंडू, आस्टर, गुलछडी, जरबेरा, शेवंती, गुलाब, लिली आदी फुलशेतीचे पीक घेतात. यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फूल शेती केली होती.
मात्र, यावर्षी वाढते तापमान व अवकाळी पाऊस यामुळे अनेक शेतकऱ्यांचा गेल्या दोन महिन्यात पिकाला केलेला खर्चही मिळाला नव्हता. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी तोडणीला आलेली फुलशेतीची नांगरणीची वेळ आली होती. दरम्यान, गेल्या दोन आठवड्यापासून फुलशेतीचे बाजारभाव वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱयांना दिलासा मिळाला असून त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
असे आहेत दर
स्थानिक बाजारपेठेत लाल झेंडू ८० ते १०० रुपये किलो, पिवळा झेंडू १०० ते १२० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. गुलछडी ८० ते १०० रुपये किलो, अस्टर १०० ते १२० रुपये किलो, जरबेरा ४० ते ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. पांढरी शेवंती १५० रुपये, पर्पल शेवंती १०० रुपये किलो, लिली बंडल १० रुपये, तुळजापुरी शेवंती ८० ते १०० रुपये किलो, जिप्सी २५० रुपये किलो दराने विकली जात आहे.
या गावांमध्ये होते फुलशेती
कमी कालावधीत अधिक उत्पादन मिळवून देणारे पीक म्हणून फूल शेतीकडे पाहिले जाते. पवनमावळातील सांगवडे, गहुंजे, दारुंब्रे, गोडुंब्रे, शिरगाव, सोमाटणे, चांदखेड, कुसगाव, साळुंब्रे आदी गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात झेंडू, आस्टर, गुलछडी, जरबेरा, शेवंती, गुलाब, लिली आदी फुलशेतीचे पीक घेतात. त्यात गुलाबाच्या शेतीवर मोठे अर्थकारण आहे. डच गुलाबाला परदेशातून मागमी असते.





