Sunil Tatkare : अजितदादांशिवाय पहिला पाडवा; तटकरेंची भावुक प्रतिक्रिया म्हणाले “मनाला कधीच…”
Sunil Tatkare : दादांशिवाय बारामती आणि पाडवा मनाला कधीच पटू शकत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Sunil Tatkare : “दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशिवाय बारामतीत पाडव्याला येण्याची वेळ यंदा आल्याने मनात प्रचंड दुःख आणि वेदना आहेत. गेल्या तीस वर्षांपासून पाडव्याच्या निमित्ताने बारामतीत येण्याची परंपरा राहिली आहे. या काळात बारामतीतील उसळलेला जनसागर अनुभवला. दादांची भेट तर होतच होती; त्याचबरोबर शरद पवार साहेबांची भेट घेण्याचाही योग सातत्याने येत होता. त्यामुळे दादांशिवाय बारामती आणि पाडवा मनाला कधीच पटू शकत नाही.” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवार निर्णय घेतील
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांवरही सुनील तटकरे यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “विलीनीकरणाचा विषय असेल, तर पक्षाच्या अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार याच याबाबतचा निर्णय घेतील. शरद पवार साहेबांना देशाच्या राजकारणाचा सहा दशकांचा अनुभव आहे. त्यामुळे या विषयावरील निर्णयात त्यांचीही भूमिका महत्त्वाची असेल.”
रामदास कदम यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देणे टाळले
रामदास कदम आणि सुनील तटकरे यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता तटकरे यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. “यासंदर्भात मी कालच बोललो आहे. मात्र, या पवित्र जागेचे महात्म्य कमी होईल, अशा पद्धतीने कोणाचेही नाव घेऊन प्रतिक्रिया द्यायची नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
अर्थखाते आम्हाला मिळालेच पाहिजे; तटकरे ठाम
दरम्यान, राज्याच्या अर्थखात्याबाबतही सुनील तटकरे यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. ते म्हणाले, “स्वर्गीय अजित पवार यांनी राज्याला विक्रमी अर्थसंकल्प दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला २०१० मध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली. तो राज्याचा ५० वा अर्थसंकल्प होता. मात्र, अजितदादांनी सलग ११ अर्थसंकल्प सादर केले होते.” महाराष्ट्राची आर्थिक घडण घडवण्यात आणि राज्याच्या विकासाला दिशा देण्यात अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे अर्थखाते आम्हाला मिळालेच पाहिजे, ही माझी ठाम भूमिका असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.




