पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 69 व्या वाढदिवशी त्यांच्यावर आधारित चित्रपटाचा पहिला लूक मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला. बाहुबली फेम दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या हस्ते “मन बैरागी’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले आहे.
बॉलिवूड कलाकारांनीही या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत टीमला शुभेच्छा दिल्या. संजय लीला भन्साळी आणि मनवीर जैन दोघांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आधिरत हा खास चित्रपट आहे. मोदींच्या आयुष्याला कलाटणी देणारा आणि आतापर्यंत क्वचितच ऐकलेल्या घटनेवर हा चित्रपट आधारलेला असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे.
या चित्रपटासाठी खूपच मेहनत घेतली आहे. यापूर्वी ही गोष्ट कधीही ऐकली नसेन असे भन्साळी यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादात म्हटले आहे. या चित्रपटाची कथा संजय त्रिपाठी यांनी लिहिली आहे आणि दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. यापूर्वी विवेक ओबेरॉयची प्रमुख भूमिका असलेला मोदींचा जीवनपट “पीएम नरेंद्र मोदी’ या नावाने प्रदर्शित झाला होता. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी मोदींचा जीवनपट सांगणारी वेबसीरिजही प्रदर्शित झाली होती.