रणगाडाभेदी नाग क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी
Updated On:

नवी दिल्ली – भारताने नाग क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. वापरासाठी सज्ज करण्याच्या दृष्टीने त्या रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची चाचणी राजस्थानच्या पोखरण वाळवंटात घेण्यात आली.
नाग क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केले आहे. दिवसा आणि रात्रीही ते क्षेपणास्त्र डागले जाऊ शकते. ते चार ते सात किलोमीटर अंतरावरील लक्ष्यावर प्रहार करू शकते.
अंतिम चाचणी यशस्वी झाल्याने नाग क्षेपणास्त्राच्या उत्पादनाची प्रक्रिया सुरू होईल. त्याशिवाय, सामरिकदृष्ट्या संवेदनशील भागांत ते तैनात करण्याचा मार्गही मोकळा होईल.
नागची यशस्वी चाचणी भारताच्या क्षेपणास्त्रविषयक प्रगतीमधील आणखी एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे. यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि लष्कराचे अभिनंदन केले आहे.





