Jaran Trailer : भय इथले संपत नाही…! ‘जारण’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज, एकदा बघाच….!

Jaran Marathi Movie Trailer : गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘जारण’ या मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रचंड व्हायरल झाले होते. यानंतर या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. अवघ्या ५० सेकंदाच्या टीझरमध्ये थरकाप उडवणारी दृश्य एकामागून एक दाखविण्यात आली होती. आता जारणचा थरारक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष मुख्य भूमिकेत असून येत्या ५ जूनला हा चित्रपट थिएटर्समध्ये रिलीज करण्यात येणार आहे.
हा चित्रपट बाझमी प्रॅाडक्शन्सने प्रस्तुत केला असून ए अँड एन सिनेमाज, एलएलपी यांच्या सहयोगाने आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अनिस बाझमी हे पहिल्यांदाच जारण चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलर लॅान्च सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. बॅालीवूडचा दादा अर्थात जॅकी श्रॅाफ याची जारणच्या ट्रेलरला विशेष उपस्थित लाभली होती.
ट्रेलरमध्ये काय ?
जारण याचा अर्थ करणी असून चित्रपटाची कथा याच गोष्टीवर आधारलेली आहे. तसेच अंद्धाश्रद्धा ही बाब देखील चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अधोरिखेत करण्यात आली आहे. राधाने एका वाड्यात पाऊल ठेवले आहे. यानंतर तिथे अनेक अनआकलनीय घडामोडी घडत जातात. राधावर ती लहान असताना जारण करण्यात आले होते. ती वाड्यात आल्यानंतर तिथे मंत्रोच्चार करताना दिसते. यामुळे या वाड्याचे गूढ वाढत जाते, असे ट्रेलरमध्ये दिसत आहे.
विशेष म्हणजे अभिनेत्री अनिता दाते ही एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत असून तिचा ट्रेलरमध्ये दिसणारा अवतार लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांच्याही भूमिका पाहायला मिळणार आहेत.





