4 जानेवारीला होणाऱ्या बैठकीबाबत केंद्रीय कृषीमंत्री म्हणाले…’आपण ज्योतिषी नाही..’

नवी दिल्ली – शेतकऱ्यांच्या आंदोलनावर येत्या 4 जानेवारीला जी बैठक होणार आहे त्या बैठकीत विधायक तोडगा निघेल अशी आशा केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी व्यक्त केली आहे. पण या बैंठकीत नेमका काय तोडगा निघेल याचे भाकित वर्तवण्यास आपण काही ज्योतिषी नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
काल पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, आमची त्यांच्याबरोबरची 30 डिसेंबरची बैठक सामोपचाराच्या वातावरणात झाली. त्यामुळे पुढील बैठकीत विधायक निर्णय होईल अशी आशा निर्माण झाली आहे असे त्यांनी नमूद केले.
केंद्राने केलेले तीन कृषी विषयक कायदे रद्द करावेत या मागणीवर शेतकरी ठाम आहेत त्यावर केंद्राची भूमिका काय असेल असे विचारता त्यांनी केवळ बघूया असे मोघम उत्तर दिले.
4 जानेवारीची चर्चा ही शेवटची चर्चा असेल काय असे विचारता ते म्हणाले की त्या विषयी मी काही सांगू शकत नाहीं. पण त्या बैठकीत जो काहीं निर्णय होईल तो देशहिताचा आणि शेतकऱ्यांच्या हिताचा असेल असे ते म्हणाले. सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये या विषयी आत्तापर्यंत सहा बैठका झाल्या आहेत. आता सातवी बैठक 4 जानेवारीला होणार आहे.





