राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे हे रूजू झाल्यापासून त्यांनी साफसफाई करण्याचा विडा उचलला आहे. आधी पोलिसांची रंगीत तालीम तर नंतर पोलीस ठाणे आवार चकाचक केले आहे. आगामी काळात रेकॉर्डवरील आरोपींची देखील साफसफाई करण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. नुकत्याच झालेल्या वार्षिक तपासणीत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस निरीक्षक दराडेंच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले.
राहुरी पोलीस ठाणे आवारात पुर्वी बहुतेक ठिकाणी अस्ताव्यस्त असलेल्या जागी बहुतांश बदल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातील सर्वच इमारतीला आकर्षक रंगरंगोटी करून ऑफीस चकाचक केली आहेत.पोलीस ठाणे परिसरात सर्वत्र सीसीटिव्ही कॅमेरे बसविले असून ती कार्यान्वित करण्यात आली आहे. एक नवीन स्वतंत्र स्वच्छता गृह देखील उभारले आहेत. तसेच 2018 पासुन 151 गुन्हातील देशी-विदेशी मद्याचा मुद्देमाल हा पोलीस ठाण्यात पडून आहे.
हा मुद्देमाल नष्ट करण्याची न्यायालयाकडून परवानगी घेतली असून लवकरच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस निरीक्षकांच्या उपस्थित हा मुद्देमाल नष्ट करण्यात येणार आहे. तसेच 1997 पासुन रॅकॉर्डरूममध्ये पडलेली कालबाह्य कागपत्रे नष्ट करण्याची देखील न्यायालयाकडून परवानगी घेण्यात आली आहे. ती अनावश्यक कागदपत्रे देखील नष्ट करण्यात येणार आहेत. तर पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामकाजासाठी जुना सेतू कार्यालयात साफसफाई करून तेथेच सुव्यवस्थित बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
संपुर्ण आवारात आकर्षक वृक्षारोपण देखील करण्यात आले आहे.पोलीस ठाणे आवारात 450 च्यावर बेवारस दुचाकी धुळखात पडल्या होत्या त्या बाहेर काढून त्यातील 161 वाहनांचा लिलाव करण्यासाठी परवानगी मागितली आहे.तर बेवारस, अपघातातील, वाहन चोरीतील मिळुन आलेले वाहनांची देखील कायदेशीर प्रकिया पूर्ण करून ज्यांची वाहने असतील त्यांनी ती सोडून घेऊन जावे असे आवाहन दराडे यांनी केले आहे.
गुन्हा विरोधी प्रतिबंध, गुन्ह्याची उकल, जनतेचा प्रतिसाद आणि पोलीस आवार या सर्व बाबीची वार्षिक तपासणी केल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी दराडेंच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले आहे. एकदंरीत पोलीस निरीक्षक प्रताप दराडे रूजू झाल्यापासून त्यांनी साफसफाईवर जोर दिला आहे. आगामी काळात तालुक्यातील गुन्हेगारांची साफसफाई करावी आणि त्याचा शुभमुहूर्त लवकरच करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.