The Epstein Files: एपस्टीन प्रकरणाने अमेरिकन राजकारणात गोंधळ ; ‘त्या’ फाईल्सवर बंदीची मागणी
The Epstein Files: अमेरिकेसह संपूर्ण जगाचे लक्ष पुन्हा एकदा जेफ्री एपस्टीनशी संबंधित प्रकरणाने वेधून घेतले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने या प्रकरणाशी संबंधित ३० लाख फाईल्स सार्वजनिक केल्या,

The Epstein Files: अमेरिकेसह संपूर्ण जगाचे लक्ष पुन्हा एकदा जेफ्री एपस्टीनशी संबंधित प्रकरणाने वेधून घेतले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने या प्रकरणाशी संबंधित ३० लाख फाईल्स सार्वजनिक केल्या, मात्र यामध्ये झालेल्या एका चुकीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
या फाईल्समध्ये अनेक पीडित महिला आणि अल्पवयीन मुलींची नावे कोणतीही गोपनीयता न राखता प्रसिद्ध झाली आहेत. या प्रकरणी आता अमेरिकन फेडरल कोर्टात तातडीने सुनावणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासोबतच फाईल्स हटवण्याची मागणी केली जात आहे.
मागच्या आठवड्यात अमेरिकन जस्टिस डिपार्टमेंटने एपस्टीन प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सार्वजनिक केली होती. यात जगातील अनेक बड्या आणि प्रभावशाली व्यक्तींचे एपस्टीनशी असलेले संबंध समोर येणार होते. मात्र, ही कागदपत्रे प्रसिद्ध करताना त्यातील पीडितांची नावे लपवण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही.
फ्लोरिडातील एका लॉ फर्मने कोर्टाला कळवले की, एका ईमेलमध्ये ३२ अल्पवयीन पीडितांची यादी होती, ज्यातील ३१ नावे स्पष्टपणे वाचता येत होती. एका पीडितेने तर तिचा घराचा पत्ताही सार्वजनिक झाल्याची तक्रार केली आहे.
कोर्टाची भूमिका आणि सरकारी स्पष्टीकरण The Epstein Files:
न्यायाधीश रिचर्ड एम. बर्मन या प्रकरणावर बुधवारी सुनावणी घेणार आहेत. वकिलांनी मागणी केली आहे की, जोपर्यंत सर्व गोपनीयता राखली जात नाही, तोपर्यंत वेबसाइटवरून या फाईल्स तातडीने हटवण्यात याव्यात.
दुसरीकडे, न्याय विभागाने म्हटले आहे की, ते या चुका दुरुस्त करण्यासाठी आणि नावे लपवण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. काही फाईल्समध्ये आक्षेपार्ह फोटोही होते, जे आता हटवण्यात आले आहेत.
या प्रकरणाने केवळ सामाजिकच नाही तर राजकीय वळणही घेतले आहे. अमेरिकन संसदेच्या चौकशी समितीसमोर माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी साक्ष देण्यास संमती दर्शवली आहे.
सुरुवातीला त्यांनी नकार दिला होता, मात्र वाढता दबाव पाहता त्यांनी आता सहकार्य करण्याचे ठरवले आहे. रिपब्लिकन नेत्यांच्या मते, क्लिंटन कुटुंबाचे एपस्टीनशी जुने संबंध आहेत, त्यामुळे त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. तर डेमोक्रॅट्सनी या चौकशीला राजकीय सूडबुद्धी म्हटले आहे.


