Rajgurunagar News : मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी राजगुरुनगर येथील सकल मराठा समाज सज्ज

राजगुरुनगर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे निघालेल्या संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी संपूर्ण राजगुरुनगर शहर सज्ज झाले आहे. आज सकाळी दहा वाजल्यापासून हजारोंच्या संख्येने सकल मराठा समाजाचे नागरिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर जमू लागले असून, साधारण साडेतीन वाजण्याच्या सुमारास जरांगे पाटील यांचे राजगुरुनगर येथे आगमन होणार आहे.
स्वागतासाठी बाजारसमितीपुढे खेड तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी दहा वाजल्यापासून उभे आहेत. जरांगे पाटील यांच्यावर जेसीबीच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव केला जाणार आहे. तालुक्याचे समन्वयक अंकुश राक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते यांनी नियोजन केले आहे.
राजगुरुनगर शहरात जरांगे पाटील दाखल झाल्यानंतर ते छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील. त्यानंतर उपस्थित मराठा बांधवांना ते मार्गदर्शनपर संबोधन करणार आहेत. पुढे मुंबईच्या दिशेने निघताना ते राजगुरुनगर एस.टी. बस स्थानकासमोरील हुतात्मा स्मृती शिल्पावर जाऊन हुतात्मा राजगुरू, भगतसिंह व सुखदेव यांच्या पुतळ्यास अभिवादन करतील.
जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी सकल मराठा समाजाच्या नागरिकांनी गच्च भरलेली वाहने राजगुरुनगर शहरातून पुढे मुंबईच्या दिशेने निघाली आहेत. यात कार, जीप, बसेस, टेम्पो, ट्रक यांचा मोठा समावेश आहे. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरुन वाहनांचे ताफे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. चाकण मार्गे हे ताफे मुंबईकडे रवाना होत असून मोठ्या संख्येने नागरिक रस्त्याच्या कडेला उभे राहून स्वागत करत आहेत.
वाहनांची प्रचंड गर्दी पाहता वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राजगुरुनगर शहरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण असून सकल मराठा समाजाच्या हाकेला हजारो बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.





