Ranjangaon : रांजणगावात काळ्या ऑइलचे साम्राज्य
Ranjangaon : औद्योगिक वसाहतीत प्रदूषण नियंत्रणाचे नियम लागू असताना अशा प्रकारच्या साठवणुकीवर आणि पदार्थांच्या हाताळणीवर संबंधित यंत्रणेचे नियंत्रण आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

रांजणगाव गणपती : रांजणगाव औद्योगिक वसाहत आणि परिसरात काळ्या ऑइलची हाताळणी व विल्हेवाट योग्य पद्धतीने केली जाते का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. यात काळसर साठा, मोठ्या औद्योगिक टाक्या, ड्रम आणि यंत्रसामग्री दिसत असून, या ठिकाणी नेमके कोणते पदार्थ साठवले जातात. त्यांची विल्हेवाट कशी लावली जाते, याची अधिकृत तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे परिसरातील शेतजमिनी, ओढे -नाल्यांमध्ये काळे ऑइल सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्या माती, पाणी आणि परिसरातील पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केवळ कागदोपत्री माहितीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
संबंधित ठेकेदाराचे प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकाऱ्यांशी नातेसंबंध असल्याचा आरोपही गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या आरोपांची निष्पक्ष पडताळणी करून संभाव्य हितसंबंधांचा संघर्ष आहे का, नियमभंगाच्या तक्रारींवर कारवाई झाली आहे का, याची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
औद्योगिक वसाहतीत प्रदूषण नियंत्रणाचे नियम लागू असताना अशा प्रकारच्या साठवणुकीवर आणि पदार्थांच्या हाताळणीवर संबंधित यंत्रणेचे नियंत्रण आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक वसाहतीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तपासणी केली आहे का, त्यातून काय निष्पन्न झाले, नियमांचे उल्लंघन आढळले असल्यास कोणती कारवाई केली? या प्रश्नांची उत्तरे नागरिकांना मिळणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने घटनास्थळी पथक पाठवावे. काळसर पदार्थांचे नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करावी, संबंधित ठिकाणच्या परवानग्या, कचरा वाहतुकीची कागदपत्रे, विल्हेवाटीच्या नोंदी तपासाव्यात, पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन सिद्ध झाल्यास संबंधित ठेकेदारासह जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
माती, पाण्याचे नमुने घ्यावेत
प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित ठिकाणची माती आणि पाण्याचे नमुने घ्यावेत, साठवलेल्या पदार्थांची ओळख निश्चित करावी, आवश्यक परवानग्या व नोंदी तपासाव्यात आणि नियमभंग आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. तपासणीचा अहवाल आणि कारवाईचा तपशील सार्वजनिक करावा, अशी मागणी होत आहे. शेतजमीन आणि नैसर्गिक नाल्यांचे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होता कामा नये. प्रदूषण रोखण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.
गाय दगावल्याची चर्चा
प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे पुणे कार्यालयातील सहा अधिकारी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली निलंबित झाले आहेत. औद्योगिक वसाहतीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण वाढले आहे. हे अधिकारी अशा मुजोर ठेकेदारांना पाठीशी घालत असल्यानेच ठेकेदारांकडून हे प्रक्रिया न केलेले ऑइल ओढ्या नाल्यांमध्ये व शेतामध्ये टाकले जात आहे. रांजणगाव एमआयडीसी हद्दीत हे ऑइल मिश्रित पाणी पिल्यावर एका शेतकऱ्याची गाय दगावल्याची चर्चा परिसरात आहे.





