निवडणूक आयोगाने झारखंडसाठी उचलले पाऊल ! नव्या पोलीस प्रमुखांची केली नियुक्ती

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी झारखंडच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले. त्यानुसार, त्या राज्याच्या पोलीस प्रमुखपदी सर्वांत वरिष्ठ आयपीएस अधिकारी अजयकुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. याआधी पोलीस प्रमुख म्हणून तात्पुरता कार्यभार अनुराग गुप्ता यांच्याकडे होता.
याआधी त्यांच्यावर निवडणूक काळात अयोग्य वर्तणूक केल्याचा आरोप होता. त्याची दखल घेऊन निवडणूक आयोगाने शनिवारी गुप्ता यांना हटवण्याचा आदेश दिला. त्यानंतर झारखंड सरकारने नव्या पोलीस प्रमुखपदासाठी 3 अधिकाऱ्यांची नावे पाठवली. त्यातील सिंह यांच्या नावावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले. ते भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) झारखंड केडरचे 1989 मधील तुकडीतील अधिकारी आहेत.
झारखंडमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्या राज्यात १३ आणि २० नोव्हेंबरला २ टप्प्यांत मतदान होईल. झारखंडमध्ये झामुमो, कॉंग्रेस आणि राजद आघाडीची सत्ता आहे. त्या आघाडीचा मुकाबला भाजप आणि मित्रपक्षांशी होईल. झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे २३ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.





