Satara: एकसर शिक्षण परिषदेची राज्यस्तरावर घेतली दखल
Satara मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण, जिल्हा परिषद शिक्षण विभाग व ग्यानप्रकाश फाउंडेशन यांच्या माध्यमातून एकसर केंद्रात मागील दोन वर्षांपासून पाच सत्रात शिक्षण परिषद घेतली जात होती.

Satara: राज्यात दरमहा शिक्षण परिषदेचे आयोजन केले जाते. त्यात एकसर (ता. वाई) येथे आयोजित शिक्षण परिषदेची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. शिक्षण परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांचा व्यावसायिक विकास, अध्ययन निष्पत्ती नियोजन, विद्यार्थी गुणवत्ता व चांगल्या उपक्रमांचे सादरीकरण केले जाते.
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण, जिल्हा परिषद शिक्षण विभाग व ग्यानप्रकाश फाउंडेशन यांच्या माध्यमातून एकसर केंद्रात मागील दोन वर्षांपासून पाच सत्रात शिक्षण परिषद घेतली जात होती. यामध्ये मागील महिन्याचा आढावा, देवाण- घेवाण, अध्ययन निष्पत्ती आधारित मासिक नियोजन, एसएमसी, पालक व लोकसहभाग आणि जिल्हास्तरीय विषय या सत्राच्या आधारे शिक्षण परिषद घेतल्या जात होत्या. शिक्षकांचे दर महिन्याचे नियोजन अध्ययन निष्पत्ती असल्याने वर्गप्रक्रियेत याची मदत झाली.
केंद्रातील सर्व शाळांची एसएमसी बैठक, पालक सभा यामुळे शैक्षणिक लोकसहभाग वाढल्याचे दिसून आले. याचा एकंदरीत परिणाम केंद्रातील विद्यार्थी गुणवत्ता वाढ झाली. याचीच दखल घेऊन 15 जुलै रोजी राज्यस्तरावरून सर्व जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर दरमहा शिक्षण परिषद पाच सत्रात घेण्यात यावी, या संदर्भात पत्र निर्गमित करण्यात आले आहे. ही निश्चितच सातारा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. याबद्दल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे, शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, ग्यानप्रकाश फाउंडेशनचे संदीप जगताप, वाई तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी हर्षवर्धन मोरे, एकसर केंद्राचे केंद्रप्रमुख व सर्व शिक्षक व शिक्षण विभाग यांचे अभिनंदन केले.





