प्रभातच्या बातमीचा इफेक्ट ! प्रदूषण नियंत्रण मंडळाची तातडीने शिरूर कचरा डेपोला भेट

शिरूर : ‘शिरूर शहरात होतय वायू प्रदूष्ण; कचरा जाळणे थांबवा… मनसेचा अल्टिमेटम’ या मथळ्याखाली दै. प्रभात मध्ये दि. २८ रोजी बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दि. २८ जानेवारी रोजी शिरूर नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट दिली. मंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये सुषमा कुंभार प्रमुख होत्या, ज्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून मनसेने केलेल्या तक्रारींची व प्रभातच्या बातमीची दखल घेतली आहे.
शिरूर नगरपरिषदेच्या कचरा डेपोमध्ये अनियमितता आणि वायू प्रदूषणाच्या समस्यांमुळे हुडको वसाहत, बाबुराव नगर, शाळा आणि महाविद्यालय परिसरातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सतत जळणाऱ्या कचऱ्यामुळे वायू प्रदूषण होऊन शिरूर शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर मोठे गंभीर परिणाम होत आहेत.
अनेकांना श्वसनाचे आजार आणि फुफ्फुसांच्या समस्या जडत आहेत, ज्यामुळे त्यांच्या जीवनमानावर त्यांचा गंभीर परिणाम होत आहे. एकुणच नगरपरीषद शिरूर शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. यात कोणताही पुढारी पुढाकार घेत नसून शिरूर शहरातील परीसर,जनता भकास होत होत चाललीआहे.
दि. २७ जानेवारी रोजी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, तालुका संघटक अविनाश घोगरे, शहराध्यक्ष आदित्य मैड, आणि शहर सचिव रवि लेंडे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे कार्यालयाकडे निवेदन सादर करून शिरूर नगरपरिषदेस कारवाईसाठी नोटीस बजावण्याची मागणी केली होती.
अधिकाऱ्यांची केली तातडीने प्रत्यक्ष पाहणी :
तक्रारीच्या अनुषंगाने व दैनिक प्रभात ने याबाबत आवाज उठवल्यानंतर २८ जानेवारी रोजी सुषमा कुंभार यांनी कचरा डेपोची प्रत्यक्ष पाहणी केली आणि परिसरातील रहिवाशांशी संवाद साधला. रहिवाशांनी त्यांना सततच्या वायू प्रदूषणामुळे होणारे आरोग्याचे धोके, श्वसनाच्या त्रासाबाबत सविस्तर माहिती दिली. वायुप्रदुषणामुळे लहान मुले, वृद्ध आणि इतर नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा पाढाच सुषमा कुंभार यांच्यापुढे मांडला.
सततच्या कचरा जळण्यामुळे शेजारील परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड दयावे लागत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने समस्येची प्रत्यक्ष पाहणी करून नगर परिषदेला उपाययोजना आखण्याचे संकेत दिले.प्रदूषण थांबवण्यासाठी नगरपरिषदेस कारवाईसाठी नोटीस बजावल्यामुळे शिरूरमधील नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरेल .आणि नगरपरिषदेवर योग्य जबाबदारी निश्चित होईल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
नगरपरिषदेवर कारवाईची नोटीस…
सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत कुंभार यांनी शिरूर नगरपरिषदेवर कारवाई करण्यासाठी अधिकृत नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.






