पिंपरी | राज्यात प्रथम आलेल्या गावाचे ‘कोरडे’ सत्य

खालापूर, {समाधान दिसले} – तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वडगावने नुकताच माझी वसुंधरा अभियान अंतर्गत कोकण विभागात पहिला, तर राज्यात सातवा क्रमांक पटकाविला होता.
ग्रामपंचायतीला ५० लाख रुपयांचे बक्षीसही प्राप्त झाले आहे. यामुळे खालापूर तालुक्यात वडगाव ग्रामपंचायतीचा चांगलाच गवगवा सुरू आहे.
मात्र अशातच वडगाव गावातील एक कोरडे सत्य सर्वांसमोर आले आहे, जे सर्वांनाच अचंबित करणारे आहे. पावसाळा संपतो ना संपतो तोच वडगावमधील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. राज्यात पहिल्या नंबरचे बक्षीस मिळविणाऱ्या या गावातील महिलांच्या डोक्यावरील हंडा अजून उतरला नाही.
शासनाच्या माध्यमातून लाखो रुपयांचे बक्षीस मिळविलेल्या ग्रुप ग्रामपंचायत वडगावमधील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे गंभीर चित्र समोर आल्याने, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ५० लाखांचे बक्षीस मिळविलेल्या या गावचे असे कोणते काम निरिक्षकांना भावले, याची चर्चा होत आहे.
गावातील महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरला नसल्याचे विदारक चित्र समोर आल्याने वडगाव ग्रामपंचायतीला कोणत्या निकषांवर पुरस्कार दिला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गावात नळपाणी पुरवठा योजना आहे, मात्र दोन ते चार दिवसांतून एकदाच पाणी मिळत असल्याचे येथील महिलांचे म्हणणे आहे. हे पाणी सुध्दा मुबलक प्रमाणात मिळत नसल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे.
गेली अनेक वर्षे येथील महिला घरापासून दूरहून पाणी आणत आहेत. सोबत रस्त्याची अवस्था देखील बिकट आहे. ग्राम पंचायतीच्या विद्यमान सदस्यांचा कार्यकाल संपला असून गावात सध्या प्रशासकीय अधिकारी काम पाहत आहे. मात्र ते देखील ही समस्या सोडविण्यात अपयशी ठरत आहेत.
आज ही परिस्थिती, मग उन्हाळ्यात कसे होणार?
आदर्श गाव म्हणून समोर येत असलेल्या खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायत वडगाव येथे महिला वर्गाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
गावामध्ये नळ योजना असूनही पाणी मिळत नाही. पावसाळा संपतो ना संपतो तर ही स्थिती असेल, तर उन्हाळ्यात काय परिस्थिती होइल, याची कल्पना न केलेली बरी. आमच्या डोक्यावरील हंडा केव्हा उतरणार असा प्रश्न स्थानिक महिला सुरेखा गडगे यांनी उपस्थित केला आहे.
वडगावमधील परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधितांना योग्य त्या सूचना देणार असून लवकरच येथील ग्रामस्थांच्या प्रश्नाचे समाधान होईल, अशी व्यवस्था केली जाईल. – संदीप कराड, गटविकास अधिकारी, खालापूर
गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसीकडून सध्या पन्नास टक्के पाणीपुरवठा केला जात आहे. यातील ऐंशी टक्के पाणी पुरवठा वडगाव गावाला केला जात आहे.
मात्र गावातील अंतर्गत पाइप लाइन टाकण्याचे काम अपूर्ण असल्याने पाणी टंचाई समस्या जाणवत आहे. लवकरच पाइप लाइनचे काम पूर्ण झाले की, सर्वांना पूरेसा पाणी पुरवठा होईल. – सुहास वारे, ग्रामसेवक, वडगाव




