Satara | माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत मान्याचीवाडीची हॅट्रिक

पाटण, (वार्ताहर) – राज्य शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
या ग्रामपंचायतीला एक कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर झाल्याने गावातील ग्रामस्थांनी एकच जल्लोष करुन एकमेकांना पेढे भरवून आनंदही व्यक्त केला. मान्याची वाडी ग्रामपंचायतीने या स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी बाजी मारून हॅट्रिक केली आहे.
पर्यावरणाच्या संगोपन आणि संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने चार वर्षांपासून माझी वसुंधरा अभियान स्पर्धा चालू करण्यात आली.
ही स्पर्धा ग्रामीण आणि शहरी विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून राबवली जाते. पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश या पंचतत्त्वावर या स्पर्धेचे मूल्यांकन केले जाते.
यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या कामाची पाहणी करण्यात येते. सन 2023 -24 या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाव परिसरामध्ये केलेले वृक्षारोपण त्याचबरोबर जुन्या झाडांचे संगोपन,
रूप टॉप वॉटर हार्वेस्टिंग, पर्यावरणीय दृष्ट्या प्रबोधन आणि जनजागृती, अपारंपारिक ऊर्जा, बायोगॅस, सौर पंप, सौर ऊर्जा त्याचबरोबर ई- वेहिकल, ई- चार्जिंग सेंटर, कंपोस्ट खत, ओला कचरा, सुका कचरा यावरती प्रक्रिया आदी बाबींवर मूल्यांकन केले जाते.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने आतापर्यंत देशी प्रजातीच्या हजारो झाडांची लागण केली आहे. त्याचबरोबर वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवल्याने जुन्या झाडांचे संगोपन करण्यात आले आहे. या ग्रामपंचायतीने अपारंपारिक ऊर्जा विकास मध्ये काम करताना महाराष्ट्रातले पहिले सौर ग्राम म्हणून बहुमान मिळवला आहे.
माझी वसुंधरा स्पर्धेमध्ये मान्याचीवाडीने सलग तिसऱ्या वर्षी बाजी मारून एक कोटी रुपयांच्या पुरस्कारासह या स्पर्धेत हॅट्रिक मिळवली आहे.
या पुरस्कारामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून येथील ग्रामस्थांनी एकत्रित येत एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.
या यशाबद्दल पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी आदिंनी अभिनंदन केले.
ग्रामस्थांची एकजूट आणि लोकसहभागामध्ये असलेले सातत्य यामुळेच मान्याचीवाडी विविध स्पर्धांमध्ये यशस्वी होत आहे. गावातील महिलांचा मोठा सहभाग आणि प्रशासनाचे सहकार्य यामुळेच या स्पर्धेत राज्यस्तरावर यशस्वी झालो. रवींद्र माने: सरपंच ग्रामपंचायत मान्याचीवाडी



