संगमनेर -संगमनेर बसस्थानकात बसमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आला. मंगळवारी (दि.21) सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना लक्षात आली. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे आढळून आल्या चिठ्ठीवरून स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
सविस्तर माहिती अशी की, सुभाष शिवलिंग तेलोरे (रा.कोल्हार कोलूबाईचे ता.पाथर्डी, जि.नगर) असे चालकाचे नाव असून कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आपली जीवयात्रा संपविली. आढळून आलेल्या चिठ्ठीत कोणाचे नाव अगर कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचेही सांगण्यात आले. मंगळवारी (दि.21) सकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. संगमनेर स्थानकात पाथर्डी-नाशिक (एम.एच.14, बी. टी. 4887) ही बस उभी होती.
बसचे वाहक पोपट साहेबा जावळे (पाथर्डी डेपो) यांनी पोलिसांना माहिती कळविली. पहाटे पाचच्या सुमारास तेलोरे आपल्या अन्य सहकाऱ्यांसह कामावर जाण्यासाठी तयार झाले. डेपोतून बाहेर पडताना ते पुढे निघाले. मी पुढे जातो, तुम्ही पाठीमागून या, असे त्यांनी सहकाऱ्यांना सांगितले. थोड्या वेळाने वाहक जावळे बसमध्ये आले.
त्यावेळी चालक तेलोरे यांचा मृतदेह बसमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. प्रवाशांना उभे राहताना पकडण्यासाठी बसच्या छताला जो बार लावलेला असतो, त्याला सुती दोरीच्या सहाय्याने तेलोरे यांनी गळफास लावून घेतल्याचे आढळून आले. याची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळी पोलिसांना चिठ्ठी मिळाली. त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख रुपयांचे कर्ज असल्याचा व त्याला कंटाळल्याचा उल्लेख आहे. मात्र, यामध्ये कोणालाही जबाबदार धरणारा नामोल्लेख पोलिसांना आढळून आला नाही. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.