सैन्यात भरती होण्याचं स्वप्न राहिले अधुरे; ‘या’ धक्कादायक कारणामुळे तरुणाने उचलले टोकाचं पाऊल

ठाणे : सैन्य आणि पोलिस दलात भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. मात्र त्याच्या आत्महत्यामागेचे कारण समोर आल्याने सर्वांच मोठा धक्का बसला आहे. मद्यपान करून गाडी चालवल्याने वाहतूक पोलिसांनी या तरूणावर कारवाई केली. इतकेच काय तर पोलिसांनी करिअर संपविण्याची भिती घातल्याने तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबाकडून केला जात आहे. त्याने आत्महत्येपूर्वी कुटुंबियांना एक संदेश पाठवला होता. त्यातून ही माहिती समोर येत आहे.
मनिष उतेकर (२४) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. तो ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात राहत होता. राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटच्या माध्यमातून या तरूणाचा फोटो आणि अखेरचा संदेश शेअर केला आहे. तसेच आव्हाडांनी “ह्या आत्महत्येला जबाबदार कोण…कारवाई कधी मुजोरी वाढली…” असा सवालही केला आहे.
ह्या आत्महत्येला जबाबदार कोण….कारवाई कधी
मुजोरी वाढली…@DGPMaharashtra @ThaneCityPolice pic.twitter.com/0lfP2XWX6N— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 28, 2023
नेमके काय लिहिले होते मनिषने अखेरच्या मेसेजमध्ये?
“मी मनिष उतेकर, गटारीच्या दिवशी माझी गाडी कोपरी ठाणे ईस्ट या भागात ट्राफिक पोलीस मोरे साहेब यांनी रात्रीच्या वेळी ड्रिंक आणि ड्राइव्ह मध्ये पकडलेली. मी आर्मी भरती, पोलीस भरती देणारा विद्यार्थी आहे. गाडी पकडलेली त्यात त्यांनी आम्हाला सांगितले तुम्ही उद्या या आम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा गेलो माफी मागितली आणि जे काय असेल ते दंड तिथेच भरायला तयार होतो पण त्यांनी मला धमकी देऊन सांगितलं कोर्टात जावं लागेल. माझ्या समोर कित्येक बाईक लाच घेऊन पैसे घेऊन सोडून दिले त्यांनी…”
“मी परत तिसऱ्या दिवशी गेलो माफी मागितली सांगितलं साहेब माझं करिअर सर्व संपून जाईल, कोर्टात गेलो तर तुम्ही दंड काय असेल ते घ्या मी देतो हिते ट्राफिक पोलीस पुष्पक साहेब, ट्राफिक पोलीस सुधाकर साहेब यांनी मला धमकी दिली तुझं करिअरच बरबाद करायचं आहे, भीती दाखवून दिली. या सर्व भीती मुळे आज मी आत्महत्या करत आहे.”
“आज ही माझ्यावर वेळ आले उद्या अशी वेळ कोणावर यायला नको, मी सर्व ट्राफिक पोलिसांचा मान ठेवतो but अस कधी कोणासोबत वागू नका जेणेकरून समोरचा माणूस प्रेशर टेन्शनमुळं आत्महत्या करेल म्हणून मी हे सर्व मेसेज करून ठेवत आहे आणि ती गाडी माझ्या मित्राची आहे. त्यांची काही चुकी नाही/ बस ट्राफिक पोलीस सुधाकर साहेब, ट्राफिक पोलीस पुष्कर साहेब यांच्या दबावामुळे मी आज आत्महत्या करत आहे.” दरम्यान, या संपूर्ण घटनेचा पोलिसांकडून तपास केला जाणार आहे.





