सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न होणार साकार; पुणे महापालिकेकडून 4,773 घरांचे बांधकाम

पुणे : आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील 2,918 पुणेकर कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न भारतीय जनता पक्षाच्या काळात मार्गी लागले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वी पूर्ततेनंतर आता पुणे महापालिकेतर्फे आणखी 4,773 घरांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या घरांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर एकूण लाभार्थी कुटुंबांची संख्या 7,691 वर जाईल.
देशात कोणीही बेघर राहू नये, प्रत्येकाचे स्वतःचे घर असावे या भावनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवाज योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणार्या गृहप्रकल्पांत बाजारभावापेक्षा कमी दराने अल्प उत्पन्न गटातील पात्र लाभार्थ्यांना घरे दिली जातात. या घरांसाठी केंद्र सरकारकडून दीड लाख रुपये आणि राज्य सरकारकडून एक लाख रुपये, असे एकूण अडीच लाख रुपयांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाते.
पुणे महापालिकेत 2017 मध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर या योजनेअंतर्गत हडपसरमध्ये तीन तर वडगाव बुद्रुक (सिंहगड रोड) व खराडी येथे प्रत्येकी एक प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पांत मिळून एकूण 2,918 घरांचे काम पूर्ण झाले. लॉटरी पद्धतीने या घरांचे वाटप करण्यात आले. 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या घरांचे लोकार्पण करण्यात आले. सप्टेंबर 2024 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला.
या टप्प्यात पुणे महापालिकेतर्फे सहा प्रकल्प प्रस्तावित असून एकूण 4,773 घरे बांधण्याचे नियोजन केले गेले आहे. त्यासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेतून 330 आणि 450 चौरस फूट अशा दोन प्रकारची घरे लाभार्थ्यांना उपलब्ध होतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी वार्षिक 3 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असावे, अशी अट होती. ती आता वार्षिक 6 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना भक्कम बांधकाम व उत्तम सुविधा असणारे घर दिले जाते. महापालिकेच्या जमिनीवर घर बांधणी होत असल्याने अवघ्या 12 ते 15 लाख रुपयांमध्ये घर उपलब्ध होते. केंद्र व राज्याचे अडीच लाख रुपये अनुदान आणि उर्वरित कर्ज यातून घराचे स्वप्न पूर्ण होते. त्यामुळे महापालिकेने या योजनेवर भर दिला आहे.
– धीरज घाटे, अध्यक्ष, भाजपा, पुणे शहर आणि माजी सभागृह नेते, पुणे महापालिका





