Nagar | विधानसभेसाठी प्रारुप मतदार यादी आज होणार प्रसिद्ध!

नगर, (प्रतिनिधी) – राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाला मतदार यादी कार्यक्रम दिला आहे. यानुसार शुक्रवारी (दि.२) जिल्ह्यातील प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती परंतु यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.\
आता मंगळवारी (दि.६) ही प्रसिद्ध होणार असून अंतिम मतदार यादी ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीत मतदार केंद्रावर सुसूत्रात आणण्यासाठी २५ जून ते ५ ऑगस्ट दरम्यान सुसूत्रिकरण कार्यक्रम राबविण्यात आला. यानुसार जिल्ह्यात नव्याने ३२ मतदार केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. संगमनेर १०, नेवासा ६, शेवगाव ३, पारनेर १, नगर शहर ११ आणि श्रीगोंदा १ अशी ३२ मतदान केंद्र नवीन अस्तित्वात येणार आहेत.
केंद्रिय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या निवडणुका संपताच महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड, जम्मू आणि काश्मीर राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
१ जुलै २०२४ या अर्हता तारखेनुसार मतदार याद्या केल्या जाणार आहेत. त्यानुसार दि.६ ऑगस्ट रोजी प्रारुप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर २० ऑगस्टपर्यंत मतदार यादीवर हरकती घेता येणार आहेत. यानंतर २० ते २९ ऑगस्ट दरम्यान या अर्जावर निर्णय घेण्यात येऊन दि.३० ऑगस्ट रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
३० ऑगस्टला अंतिम मतदार यादी
विधानसभा निवडणुकीसाठी छायाचित्रासह मतदार यादीचा सुधारित द्वितीय विशेष संक्षिप्त पुनर्रीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्यानुसार आता अंतिम मतदार यादी ३० ऑगस्टला जाहीर होणार आहे.





