हास्याचा डोस डबल होणार! पुन्हा साडेमाडे तीन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार, मोशन पोस्टर पाहा…

Sade Made Teen movie poster : मराठी सिनेसृष्टीत साडे माडे तीन या सिनेमाने मोठा इतिहास रचला होता. आजही प्रेक्षकांच्या मनात हा सिनेमा ताजा आहे. या सिनेमात दाखविण्यात आलेली कुरळे ब्रदर्सची गोष्ट प्रेक्षकांना भावला. त्यांचे पोट धरून हसायला लावणारे किस्से, यामुळे या सिनेमाला महाराष्ट्रातील सिनेरसिकांनी डोक्यावर घेतलं. आता या सिनेमाचा पुढचा भाग पुन्हा एकदा साडे माडे तीन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या सिनेमाचं मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पोस्टरवरून या सिनेमाची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. या पोस्टरमध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुरळे ब्रदर्स त्यांच्या अनोख्या अंदाजात दिसत आहे. पोस्टरमुळे या सिनेमातील हास्याचा डोस डबल होणार असल्याचं दिसत आहे. या धमाल चौकटीत अभिनेत्री रिंकू राजगुरू ही देखील सहभागी होणार आहे.
दिग्दर्शक अंकुश चौधरी याने इंन्स्टाग्रामवरून पोस्ट शेअर करत या सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर केलं आहे. पुन्हा एकदा कुरळे बंधू आणणार रंगत.. पुन्हा एकदा मनोरंजनाची मेजवानी आणि पंगत..! पुन्हा एकदा टायमिंगचे बादशाह एकत्र.. पुन्हा एकदा हास्याचे कारंजे सर्वत्र..! आता सगळीकडे वाजणार ताक धिना धीन! कारण भेटीला येतोय.. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’!! १४ नोव्हेंबर पासून सर्वत्र प्रदर्शित! असं पोस्टमध्ये अंकुशने म्हटलं आहे.
View this post on Instagram
या सिनेमात रिंकू राजगुरू, संकेत पाठक, संजय नार्वेकर, समृद्धी केळकर यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाचं छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केलं आहे. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी पुन्हा एकदा साडे माडे तीन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर अभिनेता अंकुश चौधरी याने सिनेमाचा दिग्दर्शक केलं असून, त्याचा हा दिग्दर्शनाचा पहिलाच सिनेमा असणार आहे.





