Beed News : बीडमधील गुन्हेगारीचा दबदबा पुन्हा चर्चेत! वाढदिवसाच्या बॅनरवर झळकला वाल्मिक कराडचा फोटो

Valmik Karada’s photo on the banner : मस्सोजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी समोर आली होती. या हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यात अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडले. वाढत्या गुन्हेगारीमुळे बीड जिल्ह्यात कधी काय घडेल याचा काही नेम नाही. अशातच देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा राष्ट्रवादीच्या एका नेत्याच्या वाढदिवसाच्या बॅनरवर फोटो लावण्यात आल्याने मोठी खळबल उडाली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सरचिटणीस बप्पासाहेब घुगे यांना वाढदिवसानिमित्त देण्यात आलेल्या शुभेच्छांच्या बॅनरवर वाल्मिक कराडाचा फोटो दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री धनंजय मुंडे ,मंत्री पंकजा मुंडे, मंत्री छगन भुजबळ ,महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या दिग्गजांच्या रांगेत वाल्मिक कराडचा फोटो असलेले बॅनर बीडमध्ये झळकले आहेत. प्रशासनाच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ हे बॅनर्स हटविण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस बप्पासाहेब घुगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी केलेल्या बॅनरबाजी हा प्रकार घडला. या बॅनरबाजीमुळे कराडचा जिल्ह्यात दबदबा असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, वाल्मिक कराडच्या सुटकेचे राष्ट्रवादी अजित पवार गटातील कार्यकर्त्यांना स्वप्न पडू लागले आहेत की काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
नक्की काय घडलं?
बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सरचिटणीस बप्पासाहेब घुगे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांची बॅनरबाजी करण्यात आली होती. या बॅनरवर देशमुख हत्या प्रकरणातील क्रमांक एकचा आरोपी आणि मकोका अंतर्गत कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडचा फोटो बॅनरवर वाल्मिक समर्थकांनी लावला होता. हे सर्व बॅनर अनधिकृतपणे लावण्यात आले होते. याविषयी तोंडी तक्रार केल्यानंतर काही तासातच प्रशासनाने हे बॅनर हटवले. मात्र, या बॅनरबाजीची मोठी चर्चा बीडमध्ये केली जात होती.
हेही वाचा: पंतप्रधान मोदींच्या १० तासांत १२ बैठका, दिग्गज नेत्यांशी चर्चा ; जी-७ शिखर परिषदेत भारताचे वर्चस्व





