पुणे जिल्हा | खडकवाडी शाळेची जीर्ण इमारत धोकादायक

लोणी धामणी, (वार्ताहर)– खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची जुनी इमारत धोकादायक असून शाळा व्यवस्थापन समितीने प्रस्ताव दिल्यानंतरही शिक्षण विभाग याकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.
सततच्या पावसामुळे इमारतीची वासे आणि कौले रात्रीची पडली आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे संरक्षण भिंत कोसळली आहे. शाळा व्यवस्थापन समितीने अनेक वेळा प्रस्ताव दिल्यानंतरही शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. खडकवाडीत चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत सुमारे 64 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात.
शाळेची इमारत कालबाह्य झाल्यामुळे इमारतीची दुरवस्था झाली असून भिंतींनाही मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे शाळेची इमारत कधी कोसळेल, याचा नेम नाही. शाळेची इमारत धोकादायक बनल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करावे लागत आहे.
त्यामुळे एखादी दुर्दैवी घटना घडू नये याकरिता माजी सरपंच अनिल डोके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैभव सुक्रे आणि उपअध्यक्ष शेखर सुक्रे दिलीप डोके, गुलाब वाळुंज यांनी इमारत पाडण्यासाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केला. परंतु याबाबत दखल घेण्यात आली नाही अनेक वर्षांपासून येथील शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे.





