Satara : कोरेगाव शहराच्या विकासामध्ये कधीही कमी पडणार नाही

कोरेगाव : शहर आणि परिसरातील विकास कामांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. विधानसभा निवडणुकीत देखील कोरेगाव शहराने भरभरून मतदान करून शहर विकासाला हातभार लावला आहे. कोरेगाव शहराच्या विकासामध्ये कधीही कमी पडणार नाही, अशी ग्वाही कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे यांनी दिली.
राज्य सरकारच्यावतीने विविध योजनांमधून मंजूर झालेल्या ५० लाख रुपयांच्या चौथाई प्रभागातील विकासकामांचा शुभारंभ शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता मान्यवरांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी शहरवासियांशी संवाद साधताना ते बोलत होते. प्रारंभी नामदार महेश शिंदे यांनी ग्रामदैवत श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचे दर्शन घेतले.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, नगरसेवक, नगरसेविका, माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
ना. महेश शिंदे यांनी कोरेगाव शहरातील एकही रस्ता अथवा सार्वजनिक बोळ ट्रीमिक्स काँक्रिटीकरणापासून शिल्लक राहणार नाही, असे स्पष्ट केले. संपूर्ण स्वच्छ व सुंदर करण्यासाठी पुढाकार घेतला असून जवळपास शहरातील सर्वच प्रभागात काँक्रीटचे रस्ते पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
चौथाई प्रभाग हा शहराचे हृदय स्थान असून या प्रभागाच्या विकासासाठी राजाभाऊ बर्गे आणि राहुल रघुनाथ बर्गे हे घेत असलेले परिश्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी राहुल प्रकाश बर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त फेटा बांधून सन्मान करण्यात आला. त्यानंतर ना. महेश शिंदे आणि राहूल प्रकाश बर्गे यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी शिंग तुतार यांच्या निनादात फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.





