बीरभूममधील जळीतकांडातील मृतांची संख्या झाली 9; विधानसभेत पडसाद

रामपूरहाट, कोलकाता – पश्चिम बंगालमधील बीरभूममध्ये झालेल्या जळीतकांडातील मृतांची संख्या आता 9 झाली आहे. या जळीतकांडामध्ये जखमी झाल्यावर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचा आज मृत्यू झाला. या जळीतकांडाचे आज पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्येही संतप्त पडसाद उमटले.
सत्तारुढ तृणमूल कॉंग्रेस आणि विरोधी भाजपच्या सदस्यांनी एकमेकांवर चक्क धावून जाण्यापर्यंत मजल मारली. काही सदस्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मुठीही उगारल्या होत्या. त्यामुळे विधानसभेला रणांगणाचे स्वरुप प्राप्त झाले होते. या सर्व घडामोडींमुळे विधानसभेच्या सभापतींनी विरोधी नेते सुर्वेंदु अधिकारी यांच्यासह भाजपच्या पाच सदस्यांना संपूर्ण अधिवेशनासाठी सभागृहातून निलंबित केले.
तृणमूलच्या सदस्यांनी भाजपच्या सदस्यांना सभागृहातच मारहाण केल्याचा आरोप अधिकारी यांनी सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना केला. सभागृहामध्ये आमदार सुरक्षित नाहीत. भाजचे मुख्य प्रतोद मनोज टिग्गा यांच्यासह किमान 8 ते 10 आमदारांना तृणमूलच्या सदस्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत मुख्यमंत्री÷यांनी सभागृहात निवेदन करायला पाहिजे, अशी मागणीही अधिकारी यांनी केली.
दुसरीकडे भाजपच्याच सदस्यांनी तृणमूलच्या सदस्यांना मारहाण केल्याचा आरोप तृणमूलचे आमदार असित मुजुमदार यांनी केला. मुजुमदार आणि टिग्गा यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले.
आज मृत्यू झालेल्या महिलेचे नाव नाजेमा बीबी असे असून ती 65 टक्के भाजली होती. काल रात्री तिची प्रकृती खालावल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज सकाळी तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. नाजेमा बीबीचा मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयला तिचा जबाब नोंदवणे शक्य झाले नाही. इतर तिघांवर अजूनही उपचार सुरू आहेत. त्यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.





