कला दिग्दर्शक नितीन देसाईंच्या निधनाने राजकीय वर्तुळ गहिवरलं

मुंबई – कला दिग्दर्शक नितीन देसाईंच्या निधनाने प्रतिभावंत कलावंत गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. राजकीय वर्तुळातूनही नितीन देसाई यांच्या जाण्यावर शोक व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
टेंभी नाक्याची देवी आणि नितीन देसाई यांचे वेगळे ऋणानुबंध होते. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा त्यांनी कायम जपली होती. येथील नवरात्रोत्सव त्यांच्यामुळे कायम अविस्मरणीय झाला.
त्यांच्या हातून घडलेली कलाकृती पाहण्याची कायम उत्सुकता असे. इतका उमदा माणूस आणि मित्र आज आपण गमावल्याचे वृत्त वेदनादायी आहे. वैयक्तिक माझ्यासाठी आणि कलाक्षेत्रासाठी आजचा दिवस अत्यंत दु:खद आहे. त्यांच्याप्रती श्रद्धांजली व्यक्त करतो.
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अकस्मात मृत्यूचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सिनेमा आणि कला क्षेत्रात अतिशय बहुमूल्य योगदान त्यांनी दिले होते. मुख्यमंत्री असताना मरीन लाइन्स येथे आयोजित “मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कार्यक्रम व्यवस्थेचे यशस्वी संयोजन त्यांनी केले होते. हा हरहुन्नरी कलावंत असा अचानक आपल्याला सोडून जाईल, अशी कल्पनाही केली नव्हती. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची ताकद प्राप्त होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
नितीन हा धीराचा माणूस होता, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणारा माणूस होता, त्यामुळे त्याने असा आत्मघातकी विचार का केला असेल ? त्याच्यावर ही वेळ कशामुळे आली असेल ह्याचा छडा लागला पाहिजे. असो, कोणावरही अशी वेळ येऊ नये हीच इच्छा. नितीन देसाईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली.
– राज ठाकरे, प्रमुख मनसे
सुप्रसिध्द कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई ह्यांच्या आत्महत्येची बातमी धक्कादायक आहे. अनेक मराठी-हिंदी इतिहासकालीन चित्रपट आणि मालिकांसाठी त्यांनी कलादिग्दर्शनाचं काम करुन, प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. त्यांची कामातील प्रचंड प्रतिभा अनेक नव्या प्रकल्पांना घडवत होती. त्यांचं असे जाणे मनाला न पटणारे आहे, त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली!
– उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री
राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त, प्रख्यात कलादिग्दर्शक, निर्माते नितीन चंद्रकांत देसाई यांचे निधन अत्यंत दुःखदायक व वेदनादायक आहे. प्रचंड आत्मविश्वास, नाविन्याची ओढ आणि मेहनत करण्याची तयारी असलेला एक उमदा मराठी उद्योजक आपण गमावला. मराठी सिनेसृष्टी बरोबर सर्वच क्षेत्राला बसलेला हा मोठा धक्का आहे.
– शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी
कला क्षेत्रातील माझ्या आजवरच्या प्रवासात मला लाभलेले नितीन दादांचे मार्गदर्शन आणि त्यांची साथ माझ्यासाठी खूप मोलाची ठरली आहे. ज्या “राजा शिवछत्रपती’ मालिकेत मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, त्या मालिकेचे निर्माते नितीन दादाच होते. त्यांच्या अचानक जाण्याने मनात पोरके झाल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
– अमोल कोल्हे, खासदार
प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. मराठी तसेच हिंदी सिनेमासृष्टीने एक कलात्मक व्यक्तीमत्व गमावले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष





