Khalid Ka Shivaji Movie : सिनेमावर वादाचे गडद ढग कायम! दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया समोर म्हणाले “अडीच मिनिटांच्या ट्रेलरवरून…”

Khalid Ka Shivaji Movie : ‘खालिद का शिवाजी’ हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. येत्या 8 ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होणार आहे. मात्र, या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी हिंदू महासंघाकडून करण्यात आली आहे. तसेच या सिनेमाला वाढता विरोध पाहता या सिनेमासंदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये राज्य सरकारकडून केंद्राकडे सिनेमाची पुनर्परीक्षणाची विनंती केली आहे. आता खालिद का शिवाजी सिनेमाचे दिग्दर्शक राज मोरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अडीच मिनिटांच्या ट्रेलर असा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. त्यामुळे अगोदर सिनेमा पाहावा, अशी प्रतिक्रिया राज मोरे यांनी दिली आहे. तसेच सिनेमावर घेण्यात आलेल्या आक्षेपांबाबत बोलताना ते म्हणाले माध्यमांत या गोष्टी सुरू आहेत, ट्रेलर आला त्याच्यावर वाद सुरू आहे. नेहमीच अशा गोष्टी होत राहतात. मला लोक बोलतात पण मला असं वाटत की चित्रपट पाहिल्या शिवाय त्याच्यावर टिप्पणी करणं योग्य होणार नाही.
त्या दाव्यावर स्पष्टीकरण
या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ११ अंगरक्षक होते, ३५ टक्के मुस्लिम होते, असा संवाद आहे. यावर टक्केवारीमध्ये मतभेद होऊ शकतात. म्हणजे कमी जास्त होऊ शकते, पण आपल्याला हे मान्य करावं लागेलं की शिवाजी महाराजांच्य सैन्यात मुस्लिम लोक होते. आपण इतिहासात त्यांची नाव वाचलेली आहेत, हा ऐतिहासिक चित्रपट नसून या चित्रपटाची कथा खालिद नावाच्या मुलाच्या पात्राच्या अवतीभवती फिरणारी आहे, असं स्पष्टीकरण दिग्दर्शक राज मोरे यांनी दिलं.
विरोध कायम
दरम्यान, ‘खालिद का शिवाजी’ सिनेमाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचे आणि ऐतिहासिक पुरावे नसलेले दावे केल्यामुळे शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या सिनेमावर बंदी घालावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे उद्या ८ अॅागस्टला खालिद का शिवाजी सिनेमा रिलीज होणार की नाही हे पाहणं महत्वाचे असणार आहे.





