पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेकडून शहरातील अतिक्रमण कारवाईवरील जोर वाढविण्यात आला असून, महापालिकेकडून सोमवारी कोंढवा मुख्य रस्ता, तसेच धायरी परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करत तब्बल ३७ हजार चौरसफूट अनधिकृत बांधकामे काढण्यात आली. या ठिकाणी महापालिकेने ८० मिळकतींना नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. पालिकेकडून कारवाईचे वेळापत्रकच तयार केले असून, गेल्या काही दिवसांपासून बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग, आकाशचिन्ह विभागाकडून संयुक्तपणे या कारवाया होत आहेत. बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा खुर्द मुख्य रस्ता, कौसरबाग परिसर येथे फ्रंट मार्जिन व साइड मार्जिनची सुमारे २२ हजार चौरस फूट इतक्या क्षेत्रावर कारवाई करण्यात आली. या वेळी ८० नोटिसा देण्यात आल्या. वडगाव व धायरी परिसर येथे फ्रंट मार्जिन व साइड मार्जिनची सुमारे १५ हजार चौरस फूट कारवाई करण्यात आली. या वेळी ३ नोटिसा देत पत्राशेडचे कच्चे बांधकाम पाडण्यात आले. पुण्यातील वाढत्या अतिक्रमणावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चिंता व्यक्त केली होती. याबाबत अनेक नागरिकांनी मोहोळ यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर मोहोळ यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राजकीय दबावाला बळी न पडता थेट कारवाईचे निर्देश दिले, तसेच कोणत्याही राजकीय व्यक्तीचा फोन आला तरी कारवाई थांबवू नका, असेही सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बेकायदा हॉटेल चालकांवर कारवाईचे आदेश दिले होते. दररोज अहवाल सादर करण्याचे आदेश शहरात पदपथ, फ्रंट मार्जिन, साइड मार्जिनमधील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, अनधिकृत बोर्ड, बॅनर, होर्डिंग निर्मूलन कारवाईचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय दररोज कारवाई करताना त्याचे चित्रीकरण करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. महापालिकेकडून कारवाईची नोटीस बजावल्यानंतर त्यावर पुढे काहीच कारवाई होत नव्हती, तर नागरिकांच्या तक्रारींकडेही दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे प्रशासनाने बजाविलेल्या नोटिसा आणि प्रत्यक्ष केलेली कारवाईचा याचा दैनंदिन अहवाल प्रत्येक आठवड्याला केला जात असून, गेल्या पंधरा दिवसांत महापालिकेने सुमारे ४ लाख चौरस फुटांपेक्षा जास्त अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले आहे.