Pune Gramin : “विद्यार्थ्यांच्या काव्यवाचनाने भारावलं प्रांगण, शिवनेरी विद्यालयात हिंदी दिवस साजरा”

ओझर : “हिंदी है हम, वतन है हिंदुस्तान हमारा…” अशा ओजस्वी कवितांच्या स्वरांनी आज शिवनेरी विद्यालयाचे प्रांगण भारावून गेले. हिंदी दिवसाचे औचित्य साधून शिवनेरी विद्यालय खानापूर या ठिकाणी काव्यवाचन स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत इयत्ता १ ली ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेचा आणि भाषेवरील प्रेमाचा सुंदर ठसा उमटवला.
विद्यार्थ्यांच्या ओघवत्या काव्यपठणामुळे सभागृह दणाणून गेले. प्रत्येक सादरीकरणाला टाळ्यांचा कडकडाट मिळत होता. या कार्यक्रमाने केवळ हिंदीची गोडी वाढवली नाही तर विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासालाही नवी उभारी दिली.
या प्रसंगी शिवनेरी फाउंडेशनचे संचालक डॉ. चंद्रकांत कणसे, अध्यक्ष डॉ. सरस्वती कणसे, सचिव शुभंकर कणसे व सीईओ श्रद्धा कणसे यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
हिंदी दिवसाच्या या संस्मरणीय सोहळ्याने उपस्थितांच्या मनात हिंदी भाषेबद्दल आदर, अभिमान आणि प्रेमाची नवीन ज्योत पेटवली. कार्यक्रमाला कॅम्पस इन्चार्ज राजेंद्र मुरादे, प्रशासनिक अधिकारी ज्ञानेश्वर पटाडे, शिवनेरी स्कूलचे प्राचार्य संजय मिश्रा तसेच शैक्षणिक सल्लागार अमोल थोरात यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्मिता घोणे यांनी तर समन्वयक म्हणून धनवंती ढोले यांनी केले.


