मुलीच्या तेराव्या विधीस हजर राहण्यास डीएसके यांना न्यायालयाची परवानगी

पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात येरवडा कारागृहात असलेले डीएसके ऊर्फ डी.एस. कुलकर्णी यांना त्यांच्या मयत मुलीच्या तेराव्यासाठी काही तास हजर राहण्याची न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्याचबरोबर पत्नी आणि मुलालाही या विधीसाठी हजर राहता येणार आहे. 16 ऑगस्ट रोजी हा विधी होणार आहे. विशेष न्यायाधीश जे.एन.राजे यांनी हा आदेश दिला आहे.
डीएसके यांची मुलगी अश्विनी देशपांडे यांचे करोनाच्या आजारामुळे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे निधन झाले. करोनामुळे निधन झाल्यामुळे अंत्यविधीसाठी त्यांच्याबरोबर कोणी नव्हते. त्यांच्या तेराव्याच्या विधीसाठी वडील डीएसके, आई हेमंती आणि भाऊ शिरीष कुलकर्णी यांना काही तासांसाठी जाण्याची परवानगी देण्यात यावी म्हणून ऍड. आशिष पाटणकर, ऍड. प्रतीक राजोपाध्ये यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
त्यानुसार पोलिस बंदोबस्तात आणि करोनाविषयक काळजी घेण्याच्या सूचना देऊन हा विधी करण्यासाठी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. अडीच वर्षानंतर डीएसके जेलबाहेर येणार आहेत. त्यांची मुलगी अश्विनी देशपांडे देखील गुन्ह्यात आरोपी होत्या.





