Vande Bharat Sleeper Train : कोलकाता ते गुवाहाटी दरम्यान धावणार पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन

नवी दिल्ली : कोलकाता (हावडा) आणि गुवाहाटी दरम्यान धावणाऱ्या भारताच्या पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे काम पूर्ण झाले असून लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या ट्रेनचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना वैष्णव म्हणाले की, ही सेवा पुढील १५ ते २० दिवसांत सुरू होण्याची शक्यता असून १८ किंवा १९ जानेवारीच्या आसपास तिचे उद्घाटन होऊ शकते. अचूक तारीख पुढील दोन ते तीन दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे भाडे हवाई प्रवासापेक्षा कमी असेल, असे वैष्णव यांनी स्पष्ट केले.
सध्या गुवाहाटी-हावडा दरम्यान हवाई प्रवासासाठी सुमारे ६,००० ते ८,००० रुपये खर्च येतो. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये जेवणासह तिसऱ्या एसीचे भाडे सुमारे २,३०० रुपये, दुसऱ्या एसीचे सुमारे ३,००० रुपये आणि पहिल्या एसीचे सुमारे ३,६०० रुपये असेल, असे मंत्री म्हणाले. हे भाडे मध्यमवर्गीय प्रवाशांना लक्षात घेऊन ठरवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. ही ट्रेन पश्चिम बंगालमधील हावडा आणि आसाममधील गुवाहाटी दरम्यान धावेल. यावर्षी आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.





