सहकाराला अधिक स्वायत्तता मिळणार

हर्षवर्धन पाटील : “नागवडे’च्या 48व्या गाळपाचे गव्हाणपूजन । 10 लाख मेट्रिक टन गाळपाचे हंगामात उद्दिष्ट
श्रीगोंदा – भाजप सरकारने शेतकरीहिताचे अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. नवीन सहकार धोरण येत्या तीन महिन्यांत लागू होणार आहे. त्या माध्यमातून सहकाराला अधिक स्वायत्तता मिळणार असून, त्याचा सहकार चळवळीला मोठा फायदा होणार असल्याचे प्रतिपादन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या 48व्या गाळप हंगामाच्या गव्हाण पूजनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी आ. राहुल जगताप, जिल्हा बॅंकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, धनसिंग भोईटे, “काष्टी’चे अध्यक्ष राकेश पाचपुते आदी उपस्थित होते.
या वेळी पाटील म्हणाले, नागवडे कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे. तरीही आगामी काळात उत्पन्नवाढीवर अधिक भर दिला पाहिजे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे सरासरी उत्पादन वाढविण्यासाठी कारखान्याने विशेष कार्यक्रम हाती घेण्याची सूचना हर्षवर्धन पाटील यांनी या वेळी केली. ते म्हणाले की, सहकारी कारखानदारी ही शेतकऱ्यांची चळवळ असून कोणतेही सरकार असले तरी या कारखानदारीला पाठबळ दिले पाहिजे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रातील भाजप सरकारने अनेक धाडसी निर्णय घेतले असून, कारखान्यांना तब्बल 9 हजार कोटींचा आयकर माफ करण्याचा निर्णय झाला. कोट्यवधींची गुंतवणूक करून इथेनॉल खरेदीच्या माध्यमातून केंद्र सरकार कारखानदारीला बळ देण्याचे काम करीत असल्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले.
कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले की, कारखान्याने गतवर्षी उच्चांकी 9 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले. यावर्षी कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन साडेसहा हजार मेट्रिक टनापर्यंत वाढविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्या माध्यमातून या हंगामात 10 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याचे सांगत नागवडे यांनी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून सूक्ष्म नियोजनावर भर देणार असल्याचे सांगितले. राज्य साखर संघाचे संचालक घनश्याम शेलार, कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांची भाषणे झाली. सुभाष शिंदे यांनी सूत्रसंचालन तर दादासाहेब नेटके यांनी आभार मानले.
“ते’ नागवडेंनी करून दाखवले : पाटील
नागवडे कारखाना “बीओटी’ तत्त्वावर सीबीजी प्रकल्प उभारणार असून, त्या माध्यमातून कारखान्याच्या उत्पन्नात प्रतिवर्षी अंदाजे पाच कोटींची भर पडणार आहे. गेली अनेक वर्षे सहकारात काम करीत असतानाही आम्हाला जे जमले नाही, ते राजेंद्र नागवडे यांनी करून दाखविले, अशा शब्दांत पाटील यांनी नागवडे यांचे कौतुक केले.





