‘आदिपुरुष’ बाबतचा वाद थांबेना ! ‘या’ कारणामुळे चित्रपटाच्या लेखकाने केली मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

मुंबई – 16 जून रोजी आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित झाला. भगवान श्रीराम यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन माता सीतेची भूमिका साकारत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.चित्रपटातील संवादापासून ते व्हीएफएक्सपर्यंत अनेकांवर सर्वसामान्यांनी आक्षेप नोंदवला आहे.अशात आता या चित्रपटाच्या लेखकाने मुंबई पोलिसांकडे सुरक्षेबाबतची मागणी केल्याचे समजते.
‘आदिपुरुष’चं पाहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. टिझर नंतर झालेला वाद ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कमी झाल्याचे पाहायला मिळालं. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. अशात लेखक मनोज मुंतशीर यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
‘आदिपुरुष’ चित्रपटातील वादग्रस्त संवादांवर देशभर संताप व्यक्त केला जात आहे. मनोज मुंतशीर यांनी हे संवाद लिहिले आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर मुंतशीर यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंतशीर यांनी पोलिसांकडे विद्यमान वादामुळे आपल्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा दावा केला आहे. त्यांच्या सुरक्षेच्या विनंतीवर मुंबई पोलिस योग्य तो निर्णय घेणार आहेत.
प्रभास, क्रिती सेनन व सैफ अली खान स्टारर या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पण त्यातील काही संवादांविरोधात देशभर संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी या चित्रपटावर बंदी घालण्याचीही मागणी केली आहे. रामायणावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आहेत.





