पुणे जिल्हा | दुभाजक ओलांडून कंटेनरची दुकानाला धडक

निमोणे, (वार्ताहर)- पुणे-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील सरदवाडी (ता. शिरुर) येथे भरधाव असणाऱ्या मालवाहू कंटेनर ट्रेलरच्या चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर ट्रेलरने रस्ता दुभाजक ओलांडून थेट सलूनच्या दुकानाला धडक दिली. पहाटेच्या वेळी रहादारी कमी असल्यामुळे एवढा मोठा अपघात होऊनही या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना शनिवार (दि.१) रोजी पहाटेच्या दरम्यान घडली.
मालवाहू कंटेनर ट्रेलर पोकलॅन मशीन घेऊन पुण्याकडुन-अहमदनगरकडे जात असताना सरदवाडीजवळ आल्यानंतर कंटेनर चालविणाऱ्या चालकाचा ताबा सुटल्यामुळे कंटेनर ट्रेलरने थेट रस्ता ओलांडून सलूनच्या दुकानाला धडक दिली.
हा परिसर लोकवस्तीचा असून पहाटेची वेळ असल्यामुळे सलुनचे दुकान बंद होते. इतर वेळेस वर्दळीचे असलेल्या या ठिकाणी पहाटेच्या वेळेस कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, अपघाताचा मोठा आवाज झाल्यानंतर नागरिकांसह व्यावसायिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. ही घटना जवळच सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
अपघातामध्ये सलून व्यावसायिकाच्या दुकानाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. इमारतीचेही नुकसान झाले आहे. हा अपघात एवढा गंभीर होता की, कंटेनर ट्रेलर इमारतीला धडकल्यानंतर मोठयाने आवाज झाला. इमारतीमधील लोकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला असता. परंतु ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीप्रमाणे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
पोलिसांत तक्रारच नोंद नाही
दरम्यान, घटनेमुळे नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून वाहनचालकाकडून नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी तसेच त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सरदवाडी ग्रामस्थांनी केली आहे. शिरुर पोलीस स्टेशनमध्ये या घटनेबाबत अजून कसलीही तक्रार दाखल झालेली नाही.



